
पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात लिफ्ट सेवा पुरवणाऱ्या कंपनीने जाणीवपूर्वक लिफ्ट बंद ठेवल्यामुळे हृदयरोग रुग्णांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेनेने केईएम रुग्णालय प्रशासन तसेच भोईवाडा पोलिसांकडे केली आहे.
गुरुवारी सकाळी मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे केईएम रुग्णालयातील सीव्हीटीसी इमारतीत गेले होते. त्या इमारतीत दोन लिफ्ट असून एक बंद असल्याचा प्रकार उघडकीस आला. यासंदर्भात तक्रार करण्यासाठी महाडेश्वर तसेच शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर संगीता रावत यांची भेट घेत तक्रार केली आहे. या लिफ्टच्या देखभालीची जबाबदारी कंपनीवर आहे. मात्र पालिकेने बिल थकवल्याचा राग लिफ्टसंबंधित कंपनी रुग्णांवर काढत आहे. कंपनीचा प्रतिनिधी नेहमी येऊन त्यांच्या ताब्यात असलेल्या सीव्हीटीसी इमारतीच्या टेरेसवरील केबिनमध्ये जाऊन प्रशासनाने चालू केलेली लिफ्ट बंद करतो व प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो, असे पडवळ यांनी सांगितले.