मी मोदींचाच माणूस; मुंबई विकासकामांच्या उद्घाटनाप्रसंगी काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

मी मोदींचाच माणूस; मुंबई विकासकामांच्या उद्घाटनाप्रसंगी काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील मेट्रो आणि इतर विकासकामांच्या उदघाटनाप्रसंगी मुंबईत आले होते

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे - फडणवीस सरकार आल्यापासून झालेल्या राज्यातील विकासकामांचा आढावा सांगितला. तसेच, त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. एवढचं नव्हे तर मुख्यमंत्री शिंदे दावोसमध्ये गेले असता त्यांना आलेल्या पंतप्रधान मोदींच्या प्रचितीचा अनुभवदेखील सांगितला. ते म्हणाले की, "जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भक्त आहेत. जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोसमध्ये गेलो होतो. त्याठिकाणीही मोदींचीच हवा होती. अनेक देशाच्या पंतप्रधानांनी फक्त मोदींबद्दलच विचारले होते. काही परदेशी लोकांनी मला विचारले होते की, 'तुम्ही मोदींसोबत आहात का?' त्यावर मी त्यांना म्हणालो की मी त्यांचाच माणूस आहे."

विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचा किती विकास झाला? आपण पाहिले की विकासकामांना खोडा घालण्याचे काम काहीजण करत आहेत. त्यांना त्यांचे काम करु द्या. दरवर्षी मुंबईकरांचा रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये गेलेले पैसे वाचवण्याचे काम करतो आहोत. पण हे काही लोकांना मान्य नाही. मुंबईचे रस्ते हे खड्डेमुक्त करण्याचा आमचा निर्धार आहे. पुढील ३० ते ४० वर्षे रस्त्यांना खड्डे पडणार नाहीत. म्हणून डांबरीकरणाच्या निमित्ताने काळे-पांढरे करणाऱ्या लोकांची दुकाने बंद होतील, हे त्यांचे दु:ख आहे." अशी टीका करत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरें आणि गटाला टोला लगावला. पुढे ते म्हणाले की, "काही लोकांना वाटत होते की या कार्यक्रमाचे उद्धाटन पंतप्रधान मोदींच्या हातून होऊ नये, पण नियतीसमोर कोणाचे काही चालत नाही. आमचे सरकार हे पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली उत्तम काम करत आहे. "

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in