Mumbai : पंतप्रधान मोदी दाखवणार 'वंदे भारत'ला हिरवा झेंडा

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मुंबईत (Mumbai) येणार असून अनेक 'वंदे भारत'ला (Vande Bharat) हिरवा झेंडा दाखवणार आहेत
Mumbai : पंतप्रधान मोदी दाखवणार 'वंदे भारत'ला हिरवा झेंडा
Published on

गेले अनेक दिवस चर्चेत असणाऱ्या (Mumbai) सीएसएमटी ते शिर्डी आणि सीएसएमटी ते सोलापूर या मार्गावरील ‘वंदे भारत ट्रेन’ (Vande Bharat) आज पहिल्यांदाच मार्गस्थ होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते दुपारी ३ वाजता या दोन्ही ट्रेनचे उद्घाटन होणार आहे. या ट्रेनमुळे अवघ्या ५.३० तासात शिर्डी आणि ६.३० तासात सोलापूर गाठता येणार आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून पोलीस प्रशासनाचा मोठा फौजफाटा सीएसएमटी स्थानकात सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला आहे.

मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस सीएसएमटी येथून सकाळी ६.१५ ला सुटेल आणि शिर्डीला दुपारी १२.१० ला पोहोचेल. तसेच शिर्डीहून संध्याकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी सुटेल आणि ११ वाजून १८ मिनिटांनी सीएसएमटी येथे पोहोचेल. वंदे भारत एक्स्प्रेस दादर, ठाणे आणि नाशिक रोड येथे थांबेल. मुंबई-शिर्डी मार्गावर धावणारी वंदे भारत ट्रेन साईभक्तांसाठी विशेष पर्वणी ठरणार असून, या मार्गावर चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास रेल्वे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी व्यक्त केला. कसारा आणि भोर घाटात या दोन्ही एक्स्प्रेसच्या चाचण्या मागील आठवड्याभरापासून घेण्यात येत आहेत. या गाड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे गाड्यांचा ताशी ११० किमी असलेला वेग, ट्रेनची टक्कर टाळण्यासाठी 'कवच' संरक्षण यंत्रणा या गाड्यांमध्ये समाविष्ट केली आहे.

वेगामुळे प्रवाशांच्या वेळेत सामान्य एक्स्प्रेसच्या तुलनेने २ तासांहून अधिक वेळ वाचत असून, प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार या एक्स्प्रेसमध्ये सर्व सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रत्येक आसनांच्या ठिकाणी चार्जिंग सुविधेसह, मोठ्या आकाराच्या खिडक्या, एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये स्वयंचलित प्लग दरवाजे, इमर्जन्सी टॉक-बॅक युनिट्स, टच-फ्री सुविधांसह बायो व्हॅक्यूम टॉयलेट, दिव्यांगजन प्रवाशांसाठी विशेष शौचालय अशा अनेक सुविधा या गाड्यांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे आधुनिक अशा ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला प्रवाशांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळणार असल्याचे रेल्वे महाव्यवस्थापक लालवानी यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in