

मुंबई : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी दुपारी मुंबईतील लोक भवन येथे दाखल झाले. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. मुंबई विमानतळावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे देखील पंतप्रधानांच्या स्वागतावेळी उपस्थित होते. लोक भवन येथे पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांची गळाभेटही झाली. पंतप्रधान मोदी यांच्या निमंत्रणावरून राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत. मॅक्रॉन यांच्यासोबत फ्रान्सच्या फर्स्ट लेडी ब्रिजिट मॅक्रॉन याही भारत दौऱ्यावर आल्या आहेत.
द्विपक्षीय संबंधांना नवे बळ?
पंतप्रधान मोदी लोक भवन येथे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दिलेल्या माहितीनुसार, भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीअंतर्गत झालेल्या प्रगतीचा सर्वंकष आढावा या चर्चेत घेतला जाणार आहे. मॅक्रॉन यांचा हा दौरा द्विपक्षीय संबंधांना नवे बळ देणारा ठरेल, असे मानले जात आहे. या बैठकीत दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंध अधिक बळकट करण्याबरोबरच उदयोन्मुख आणि भविष्याभिमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच प्रादेशिक आणि जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेते आपापले विचार मांडणार असल्याचे अधिकृत निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मुंबईत दोन्ही देशांदरम्यान विविध करारांवर स्वाक्षऱ्या होतील आणि त्यानंतर संयुक्त प्रसिद्धीपत्रक जारी केले जाणार आहे.
‘इंडिया-फ्रान्स ईयर ऑफ इनोव्हेशन २०२६’
मोदी आणि मॅक्रॉन या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत गेट वे ऑफ इंडिया परिसरात इंडो-फ्रान्स सांस्कृतिक कार्यक्रमाचे तसेच मुंबईतील ताज हॉटेल येथे ‘इंडिया-फ्रान्स इनोव्हेशन फोरम’ आयोजित करण्यात आले आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे ‘इंडिया-फ्रान्स ईयर ऑफ इनोव्हेशन २०२६’ आणि सांस्कृतिक स्मरणोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, सायंकाळी सुमारे ५.१५ वाजता पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन संयुक्तपणे ‘भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष २०२६’चा शुभारंभ करणार आहेत. यावेळी दोन्ही देशांतील उद्योगपती, स्टार्टअप संस्थापक, संशोधक आणि नवोन्मेष क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित राहणार असून त्यांना दोन्ही नेते संबोधित करणार आहेत. यानंतर दोन्ही नेते नवी दिल्ली येथे होणाऱ्या ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’मध्ये सहभागी होणार आहेत.
‘ईयर ऑफ इनोव्हेशन २०२६’ या उपक्रमांतर्गत नवकल्पना, तंत्रज्ञान, संशोधन आणि लोकांमधील परस्पर सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. मोदी यांच्या निमंत्रणावरून होणारा मॅक्रॉन यांचा हा चौथा भारत दौरा असून, भारत-फ्रान्स सामरिक भागीदारी अधिक दृढ होत असल्याचे यावरून स्पष्ट होते. विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि नव्या तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशांचा भर असेल. भारतामधील फ्रेंच दूतावासाने सोशल मीडियावर माहिती देताना सांगितले की, हा दौरा द्विपक्षीय संबंधांना नवे बळ देणारा ठरेल. २०१८ मधील मॅक्रॉन यांच्या पहिल्या भारत दौऱ्याने भारत-फ्रान्स संबंधांना नवे आयाम मिळाले होते. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, ‘एआय समिट’ हा ‘लोक, पृथ्वी आणि प्रगती’ या तीन प्रमुख सूत्रांवर आधारित असेल.