पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर; विविध प्रकल्पांचे उद्घाटन करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्र येथे दाखल होणार आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रPTI
Published on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्र येथे दाखल होणार आहेत. या कार्यक्रमात ते २९ हजार ४०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमाराला पंतप्रधान जी-ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुलातील आयएनएस टॉवर्सचे उद्घाटन करणार आहेत.

१६ हजार ६०० कोटी रुपये खर्चाच्या ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पाची पंतप्रधान पायाभरणी करणार आहेत. तर ठाणे आणि बोरिवली दरम्यान हा दुहेरी ट्यूब बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहे. ज्यामुळे बोरिवलीच्या दिशेने पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि ठाणेकडील ठाणे घोडबंदर रोड दरम्यान थेट संपर्क व्यवस्था निर्माण होईल. या प्रकल्पाची लांबी ११.८ किमी आहे. यामुळे ठाणे ते बोरिवली हा प्रवास १२ किमीने कमी होईल आणि प्रवासाच्या वेळेत सुमारे १ तासाची बचत होणार आहे.

६३०० कोटी रुपये खर्चाच्या गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या बोगद्याच्या कामाची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग ते मुलुंड येथील पूर्व द्रुतगती महामार्ग दरम्यान रस्ता जोडणे ही गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाची कल्पना आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाची एकूण लांबी अंदाजे ६.६५ किलोमीटर आहे. हा प्रकल्प पश्चिम उपनगरांना नवी मुंबई येथील नवीन प्रस्तावित विमानतळ आणि पुणे मुंबई एक्स्प्रेस वे शी थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. पंतप्रधान वांद्रे-कुर्ला संकुलातील इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (आयएनएस) टॉवर्सचे उद्घाटन करतील.

रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण

पंतप्रधान कल्याण यार्डाच्या पुनर्रचनेच्या कामाची तसेच नवी मुंबईमध्ये तुर्भे येथे गतिशक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनलच्या कार्याची पायाभरणी देखील करणार आहेत. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवे फलाट (प्लॅटफॉर्म) तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील फलाट क्र.१० आणि ११ चा विस्तारीत भाग यांचे लोकार्पण देखील होणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा प्रारंभ

मुंबई दौऱ्यात सुमारे ५६०० कोटी रुपये खर्चाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा प्रारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते केला जाणार आहे. हा एक परिवर्तनकारी अंतर्वासिता कार्यक्रम असून १८ ते ३० या वयोगटातील तरुणांना कौशल्य सुधार आणि उद्योगाभिमुखतेच्या संधी देऊन तरुणांमधील बेरोजगारीची समस्या सोडवणे, हे यामागचे उद्दिष्ट आहे.

logo
marathi.freepressjournal.in