मुंबई : जेट एअरवेजचे संस्थापक, कर्करोगग्रस्त उद्योगपती व ५३८ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी नरेश गोयल यांना रुग्णालयात वैयक्तिक मदतनीस ठेवण्यास विशेष पीएमएलए न्यायालयाने गुरुवारी परवानगी दिली. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात कर्करोगाचे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी ‘ईडी’ने घेतलेले आक्षेप अनावश्यक असल्याचे न्यायालयाने सांगून ते फेटाळून लावले. पीएमएलए विशेष न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे म्हणाले की, आरोपी अर्जदार स्ट्रेचरवर असताना व ईडी कर्मचाऱ्यांच्या व पोलिसांच्या देखरेखेखाली आहे. हे पुरेसे नाही का? त्यांना मदतनीस देण्यास विरोध करणे योग्य आहे का? मानवतेच्या भूमिकेला विरोध का? प्रसाधनगृहात, आंघोळ रूममध्ये सीसीटीव्ही बसवण्याची ईडीची इच्छा आहे का? त्याच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू असताना हे सर्व करण्याची गरज आहे का? असे न्यायाधीशांनी नमूद केले. ईडीची भूमिका ही राज्यघटनेने व्यक्तीला दिलेल्या हक्काच्याविरोधात आहे.
न्यायाधीशांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबातील पुरुष व्यक्ती त्यांच्यासोबत हॉस्पीटलमध्ये नाही. त्यांची पत्नीही कर्करोगाने आजारी असून ती अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे रुग्णालयात त्यांची काळजी कोण घेणार? त्यांच्यावर प्रोटेस्ट सर्जरी झाली आहे. त्यांच्या रोजच्या नैसर्गिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरुष मदतनीसाची गरज आहे. हे काम त्यांची मुलगी किंवा पत्नी करू शकते का? ईडीकडे याचे उत्तर आहे का? असा प्रश्न न्यायालयाने केला. रुग्णालयात मला २४ तास मदतनीस द्यावा, अशी विनंती गोयल यांनी न्यायालयात केली होती. मात्र, ईडीने या विनंतीला विरोध केला. रुग्णालयाचे प्रशासन सर्व काळजी घेण्यास समर्थ असल्याचा दावा ‘ईडी’ने केला.