
विविध कारणांमुळे रखडलेल्या पोईसर नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कामाला अखेर मुहुर्त मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात पोईसर नदी शेजारील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येत असून ३० कुंटुंबियांपैकी ११ पात्र लाभार्थ्यांना माहुल येथे सदनिका देण्यात आल्या आहेत. तर कांदिवली पूर्वेकडील प्रकल्पग्रस्तांना सदनिका उपलब्ध करुन देण्याची मागणी पालिकेने एसआरएकडे केली असून उर्वरित पात्र कुटुंबियांचे पुनर्वसन ऑक्टोबर नंतर करण्यात येणार आहे. या कामासाठी पालिका तब्बल १,४८२ कोटी रुपये खर्चणार आहे.
मुंबईतील नद्यांचे अस्तित्व २६ जुलै २००५ मध्ये मुंबईत आलेल्या महापुरानंतर समोर आले. नद्यांचे नाले झाले असून प्रदूषणामुळे नद्यांचे अस्तित्वात धोक्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील नद्यांना पुनर्जीवित करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. दहिसर, पोईसर, ओशिवरा आणि वालभट्ट नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्धार केला आहे. नद्यांचे पुनरुज्जीवन करत असताना पोईसर नदी शेजारील रहिवाशांचे पुनर्वसन करणे गरजेचे होते. पोईसर नदी शेजारी ३० झोपडपट्टीधारक असून यापैकी पात्र ११ झोपडीधारकांना माहुल येथे सदनिका उपलब्ध करण्यात आल्याची माहिती कांदिवली आर साऊथच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी सांगितले.
पाणी तुंबण्यापासून सुटका!
पोईसर नदी शेजारी संरक्षक भिंत बांधण्यात काम पूर्ण झाल्याने यंदाच्या पावसाळ्यात परिसरातील झोपड्या व सोसायट्यांमध्ये पाणी जमा होण्याच्या त्रासातून सुटका होणार आहे.