मुंबई : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम कासकरवर त्याच्याच राहत्या घरी विषप्रयोग झाल्याच्या वृत्ताने गुन्हेगारी जगतात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, दाऊदवर कराचीतील एका नामांकित रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सोशल मीडियावर दाऊदचा मृत्यू झाल्याची जोरदार चर्चा आहे, मात्र या वृत्ताला मुंबई पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. दुसरीकडे वाढदिवसापूर्वी दाऊदच्या मृत्यूचे वृत्त नेहमीचेच झाल्याचा दावा दाऊद टोळीशी संबंधितांनी केला.
मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटापूर्वीच दाऊद विदेशात पळून गेला होता. काही वर्षे दुबईत राहिल्यानंतर तो पाकिस्तानात पळून गेला. तेव्हापासून तो कराचीत त्याच्या कुटुंबीयांसोबत राहत आहे. त्याच्या बंगल्यावर कडेकोट बंदोबस्त असून तो आयएसआयच्या निगराणीखालीच राहतो.
दाऊदच्या परवानगीशिवाय त्याला कोणीही भेटत नाही. त्याच्या बंगल्यापासून काही अंतरावर आयएसआयसह स्थानिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. तिथे कोणालाही येण्यास सक्त मनाई आहे. असे असतानाच दाऊदवर त्याच्याच राहत्या घरी विषप्रयोग झाला असून त्याच्यावर एका नामांकित रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला वाचविण्याचे डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या वृत्ताने गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.
दक्षिण मुंबई दाऊदचे काही नातेवाईकांसह मित्र, हिंतचिंतक राहत असून या वृत्तानंतर ते सर्वजण भूमिगत झाले होते. याबाबत कोणीही काहीही बोलण्यास तयार नाही. प्रत्येक जण आपल्या परीने या माहितीची शहानिशा करत आहे. दुसरीकडे मुंबई पोलिसांकडून या वृत्ताचे खंडन करण्यात आले नाही किंवा दुजोरा देण्यात आला नाही. एका अधिकाऱ्याने दाऊदवर विषप्रयोग झाला का, याबाबत माहिती नसली तरी त्याच्यावर कराचीतील एका रुग्णालयात उपचार सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
दाऊदवर उपचार सुरू असल्याने या रुग्णालयाला आयएसआयसह स्थानिक पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त आहे. त्याच्या मजल्यावर त्याच्या कुटुंबीयांशिवाय कोणालाही पाठविले जात नाही. गेल्या काही वर्षांपासून दाऊद हा विविध आजारांनी ग्रस्त असून त्याला नीट चालता येत नाही. त्याच्यासाठी २४ तासांत केअरटेकर आहे. आजाराला दाऊद हा प्रचंड कंटाळून गेल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्याने टोळीची सर्व सूत्रे त्याचा भाऊ अनिस इब्राहिम, जवळचा सहकारी छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेमनसह इतरांवर सोपविली होती. ते सर्वजण दाऊदच्या इशाऱ्यावरून आंतरराष्ट्रीय अतिरेकी नेटवर्क चालवून भारतविरोधी असलेल्या विविध अतिरेक्यांना मदत करतात. शस्त्रांच्या तस्करीसह नार्को, गुन्हेगारी सिंडीकेट, मनी लाँड्रिंग, एफआयसीएन संचलन, अनधिकृत जागा ताब्यात घेणे, अतिरेक्यांना आर्थिक मदत करणे, महत्त्वाच्या प्रॉपर्टीवर कब्जा करणे आदी काम करतात.
दाऊदवर झालेल्या विषप्रयोगाच्या वृत्ताने गुन्हेगारी जगतात एकच खळबळ उडाली आहे. या वृत्ताबाबत भारतीय गुप्तचर यंत्रणा कामाला लागली असून या यंत्रणेकडून अद्याप मुंबई पोलिसांना अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
बॉम्बस्फोटानंतर दाऊद हा आयएसआयच्या आश्रयाला गेला आणि कायमचा कराचीत राहू लागला. २००३ साली त्याला आंतरराष्ट्रीय अतिरेकी म्हणून घोषित करण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध मुंबईसह देशभरातील विविध शहरांत अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. जानेवारी २०२३ साली त्याने दुसरे लग्न केल्याचीही चर्चा होती. बॉलिवूडवर दाऊदचे असलेले प्रेम पाहता त्याच्याबाबत जाणून घेण्याची अनेक चित्रपट निर्माता-दिग्दर्शकांना इच्छा होती. ही माहिती दाऊदशी संबंधित लोकांकडून मिळाल्यानंतर दाऊदवर पाचहून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यात शूटआऊट अॅट लोखंडवाला, वन्स ए टाइम इन मुंबई, हसीना पारकर, वन्स ए टाइम इन मुंबई दुबारा, डी डे आदी चित्रपटांचा समावेश होता. यातील हसीना पारकर या चित्रपटात श्रद्धा कपूरने हसीनाची भूमिका साकारली होती. हसीनाच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असला तरी तिचे दाऊद व त्याच्यासह त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध घडलेले अनेक प्रसंग या चित्रपटात दाखवले.
दुसरीकडे विषप्रयोगानंतर प्रकृती प्रचंड ढासळल्याने रुग्णालयात उपचारादरम्यान दाऊद इब्राहिमचा मृत्यू झाल्याची जोरदार अफवा आहे. मात्र या मृत्यूच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. गुन्हेगारी जगतात दाऊदच्या मृत्यूची अनेकदा अफवा पसरली होती. त्यापूर्वी २०१६ साली दाऊदला गँगरिन झाल्याचे वृत्त आले होते. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात होते. त्यानंतर एक वर्षाने दाऊदचे हृदयविकराच्या झटक्याने निधन झाल्याचेही वृत्त आले होते. मात्र ते वृत्तही खोटे ठरले होते. याबाबत छोटा शकीलने एका मुलाखतीत या वृत्ताचे खंडन करताना दाऊद ठणठणीत असल्याचा दावा केला होता.
दाऊदवरील विषप्रयोग आणि त्याच्या मृत्यूच्या वृत्तानंतर पाकिस्तानातील इंटरनेट सेवा अचानक बंद करण्यात आली आहे. यामागील कारणाचा खुलासा झाला नाही. कुठलीही पूर्वसूचना न देता ही सेवा बंद करण्यात आली होती. दाऊदवर विषप्रयोग झाला म्हणून ही सेवा बंद केल्याची अफवा सोशल मीडियावरून येत आहे. मात्र इम्रान खानच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफच्या रॅलीमुळे ही सेवा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.