
१३ हजार रुपयांची लाच घेताना देवनार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ बानकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. विनयभंगाच्या गुन्ह्यांतील आरोपीला मदत करण्यासाठी त्यांनी आरोपीच्या पत्नीकडे २५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.
यातील तक्रारदार महिला गोवंडीतील देवनार परिसरात राहते. गेल्या आठवड्यात तिच्या पतीविरुद्ध देवनार पोलीस ठाण्यात विनयभंगाच्या एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. या गुन्ह्यात तिच्या पतीला मदत करण्यासाठी तसेच गुन्ह्यांतील नाव कमी करण्याचे आश्वासन देऊन पोलीस निरीक्षक हरिभाऊ बानकर यांनी तक्रारदार महिलेकडे २५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने तिने पोलीस निरीक्षक हरिभाऊ बानकर यांच्याविरुद्ध देवनार पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर गुरुवारी या पथकाने देवार पोलीस ठाण्यात सापळा लावला होता. यावेळी लाचेचा १३ हजार रुपयांचा हप्ता घेताना हरिभाऊ यांना या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.