Mumbai : कोठडीतील मृत्यूप्रकरणी दोघा पोलीस अधिकाऱ्यांना ७ वर्षे तुरुंगवास; विशेष CBI न्यायालयाचा निकाल

सोळा वर्षांपूर्वी कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणात दोघा पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी दोषी ठरवले. आरोपी पोलीस अधिकाऱ्यांनी कैद्याचा पोलीस कोठडीत छळ केल्याचे सिद्ध झाले. त्याआधारे न्यायालयाने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सात वर्षांचा तुरुंगवास आणि प्रत्येकी ६२,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Mumbai : कोठडीतील मृत्यूप्रकरणी दोघा पोलीस अधिकाऱ्यांना ७ वर्षे तुरुंगवास; विशेष CBI न्यायालयाचा निकाल
Published on

मुंबई : सोळा वर्षांपूर्वी कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणात दोघा पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी दोषी ठरवले. आरोपी पोलीस अधिकाऱ्यांनी कैद्याचा पोलीस कोठडीत छळ केल्याचे सिद्ध झाले. त्याआधारे न्यायालयाने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सात वर्षांचा तुरुंगवास आणि प्रत्येकी ६२,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाच्या रकमेपैकी १ लाख रुपये मृत अल्ताफ शेखच्या आईला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

कोठडीतील एका कैद्याचा छळ करण्यात आला. त्यात त्या कैद्याचा ११ सप्टेंबर २००९ रोजी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून संजय खेडेकर (५५) आणि रघुनाथ कोळेकर (६२) या दोघा पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच सीबीआयने तिसऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावरही गुन्हा दाखल केला होता. परंतु खटला प्रलंबित असतानाच तिसऱ्या आरोपीचा २०२३ मध्ये मृत्यू झाला.

भारतीय दंड संहितेच्या कलम ३३० अंतर्गत कबुलीजबाब देण्यासाठी किंवा मालमत्ता परत मिळवण्यासाठी स्वेच्छेने दुखापत करणे या आरोपाखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर खेडेकर आणि कोळेकर यांना कधीही अटक करण्यात आली नाही. तथापि, या प्रकरणातील सबळ पुराव्यांच्या आधारे दोन्ही आरोपी पोलिसांचे दोषत्व सिद्ध झाल्याने विशेष सीबीआय न्यायालयाने त्यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह प्रत्येकी ६२ हजार रुपयांच्या दंडाचा दणका दिला.

अल्ताफ शेखचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आणि आरोपींना हत्येच्या आरोपातून मुक्त केले. मात्र, शेखवर कोठडीत हल्ला झाला होता हे सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यांना सात वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा ठोठावली.

logo
marathi.freepressjournal.in