राज्यातील पोलीस भरती पुढे ढकलली

नियोजित वेळापत्रकानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हानिहाय भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार होती
राज्यातील पोलीस भरती पुढे ढकलली

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून जाहीर केलेली पोलीस भरतीची प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव तूर्त स्थगित करण्यात आली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हानिहाय भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार होती. आता ही प्रक्रिया थांबवण्यात आली असून जाहिरात केव्हा प्रकाशित करायची, याची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

राज्याचे पोलीस महासंचालक (प्रशिक्षणे व विशेष पथके) संजय कुमार यांनी २९ ऑक्टोबर रोजी यासंबंधीचा आदेश सर्व जिल्हा पोलीस दलाच्या प्रमुखांना पाठवला आहे. प्रशासकीय कारणास्तव जाहिरात देण्याची कार्यवाही तूर्त स्थगित करण्यात आली आहे. ही जाहिरात प्रसिद्ध करण्यासंबंधीची तारीख नंतर कळविण्यात येणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार सुमारे १४ हजार ९५६ पदांसाठीची भरती प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार होती. यासाठी जिल्हानिहाय पदसंख्या, आरक्षण वगैरे गोष्टी निश्चित करण्यात आल्या होत्या. त्याची माहितीही जाहीर झाली होती. आता यासंबंधी १ नोव्हेंबरपासून जाहिरात प्रसिद्ध करून जिल्हानिहाय भरतीची कार्यवाही सुरू करणे बाकी होती. असे असताना शनिवारी अचानक ही कार्यवाही स्थगित केल्याचा आदेश आला आहे. त्यामुळे बहुचर्चित पोलीस भरती लांबणीवर पडली आहे.

दरम्यान, राज्याच्या पोलीस मुख्यालयातून शुक्रवारी प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर केले होते. रिक्त १४ हजार ९५६ जागांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १ हजार ८११, अनुसूचित जमातीसाठी १ हजार ३५०, विमुक्त जाती (अ) या प्रवर्गासाठी ४२६, भटक्या जमाती (ब)साठी ३७४, भटक्या जमाती (क) साठी ४७३, भटक्या जमाती (ड) साठी २९२, विमुक्त मागास प्रवर्गासाठी २९२, ओबीसींसाठी २ हजार ९२६, ईडब्ल्यूएससाठी १ हजार ५४४ आणि खुल्या प्रवर्गासाठी ५ हजार ४६८ जागा, असे आरक्षण जाहीर केले होते.

कुठे किती रिक्त जागा?

मुंबई - ६७४०, ठाणे शहर - ५२१, पुणे शहर - ७२०, पिंपरी चिंचवड - २१६, मिरा भाईंदर - ९८६, नागपूर शहर - ३०८, नवी मुंबई - २०४, अमरावती शहर - २०, सोलापूर शहर- ९८, लोहमार्ग मुंबई - ६२०, ठाणे ग्रामीण - ६८, रायगड -२७२, पालघर - २११, सिंधूदुर्ग - ९९, रत्नागिरी - १३१, नाशिक ग्रामीण - ४५४, अहमदनगर - १२९, धुळे - ४२, कोल्हापूर - २४, पुणे ग्रामीण - ५७९, सातारा - १४५, सोलापूर ग्रामीण - २६, औरंगाबाद ग्रामीण- ३९, नांदेड - १५५, परभणी - ७५, हिंगोली - २१, नागपूर ग्रामीण - १३२, भंडारा - ६१, चंद्रपूर - १९४, वर्धा - ९०, गडचिरोली - ३४८, गोंदिया - १७२, अमरावती ग्रामीण - १५६, अकोला - ३२७, बुलढाणा - ५१, यवतमाळ - २४४.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in