पोलिसांना घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज मिळणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतला निर्णय

पोलिसांना खासगी बँकांकडून कर्ज घेऊन पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळामार्फत योजना राबविण्यात येत होती
पोलिसांना घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज मिळणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतला निर्णय

राज्यातील पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत घरबांधणीसाठी कर्ज देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

१० एप्रिल, २०१६च्या शासन निर्णयाप्रमाणे राज्यातील पोलिसांना खासगी बँकांकडून कर्ज घेऊन पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळामार्फत योजना राबविण्यात येत होती. त्याप्रमाणे पाच हजार १७ पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना मे २०१९पर्यंत घरबांधणी अग्रीम देण्यात आले आहे. त्यानंतर ७ जून २०२२च्या शासन निर्णयाप्रमाणे ही योजना खंडित करून पोलिसांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय नियमित घरबांधणी अग्रीम योजना देण्याचा निर्णय झाला होता; मात्र या घरबांधणीसाठी सात हजार ९५० अर्ज प्राप्त झाले असून त्यासाठी २ हजार १२ कोटींची गरज भासणार आहे. मात्र इतकी मोठी रक्कम शासनाकडून एकरकमी उपलब्ध होणे शक्य नसल्याने पूर्वीप्रमाणेच बँकामार्फत कर्ज घेण्याची योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाला चालना

नागपूर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-१ला चालना देण्यासाठी सुधारित नऊ हजार २७९ कोटींच्या सुधारित खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रकल्पाचा मूळ मंजूर खर्च आठ हजार ६८० कोटी इतका असून, त्यात ५९९ कोटी सहा लाख रुपये इतकी वाढ झाली आहे. नागपूर मेट्रो रेल टप्पा १-प्रकल्पामध्ये ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान मार्गिका क्र.१ आणि प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर ही मार्गिका क्र.२ अशा एकूण दोन मार्गिकांचा तसेच ३८ स्थानकांचा समावेश आहे.

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती

उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना संजीवनी मिळणार आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देण्यासाठी ११ हजार ७३६ कोटी ९१ लाख रुपयांच्या सुधारित खर्चास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील दोन जिल्ह्यांतील अवर्षणप्रवण क्षेत्रातील १३३ गावांतील १ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प हा गोदावरील मराठवाडा पाटबंधारे विकास मंडळ, औरंगाबाद अंतर्गत उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्याच्या भागात प्रस्तावित असून, प्रथम टप्प्यात ७ अब्ज घनफूट तर दुसऱ्या टप्प्यात १६.६६ अब्ज घनफूट असे एकूण २३.६६ अब्ज घनफूट पाणी वापर आहे. या प्रकल्पामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, भूम, वाशी, कळंब, तुळजापूर, लोहारा आणि उमरगा तसेच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याला लाभ होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in