पोलिओ, पिवळ्या तापाच्या लसीकरण केंद्राचे लोकार्पण संपन्न;कूपर रुग्णालयात प्रतिबंधात्मक लस उपलब्ध

आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी व गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत या केंद्रात पोलिओ आणि पिवळ्या तापाची लस संधंधित लाभार्थ्यांसाठी उपलब्ध असेल
पोलिओ, पिवळ्या तापाच्या लसीकरण केंद्राचे लोकार्पण संपन्न;कूपर रुग्णालयात प्रतिबंधात्मक लस उपलब्ध

मुंबई : अफ्रिकन देशात पिवळ्या तापाचे रुग्ण आढळतात. भारतातून अफ्रिकन देशात जाणाऱ्या भारतीयांना पिवळ्या तापावर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करण्यात आली आहे. ही लस घेतल्यानंतर दिलेले जाणारे प्रमाणपत्र आता कायमस्वरुपी असणार आहे. यापूर्वी दर १० वर्षांनी नवीन प्रमाणपत्र घेणे गरजेचे होते. परंतु आता कायमस्वरुपी प्रमाणपत्र मिळणार असल्याने अफ्रिकन देशात जाणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पिवळ्या तापावर प्रतिबंधात्मक लस आता कूपर रुग्णालयात उपलब्ध झाली असून सोमवारी लसीकरण केंद्राचा लोकार्पण सोहळा मुंबई विमानतळाचे आरोग्य अधिकारी डॉ. अच्छेलाल पासी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी व गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत या केंद्रात पोलिओ आणि पिवळ्या तापाची लस संधंधित लाभार्थ्यांसाठी उपलब्ध असेल.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या सुचनेनुसार, त्याचप्रमाणे उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रूस्तम नरसी कूपर रुग्‍णालयामध्‍ये पिवळ्या तापाचे लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. केंद्र शासनाने देखील या लसीकरण केंद्रासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व परवानग्या दिल्या आहेत.

या सोहळ्याला, रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते, औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र केंभावी, डॉ. स्मिता चव्हाण, डॉ. संजय पांचाळ, डॉ. प्रसाद ढिकले, डॉ. रोशनी मिरांडा, डॉ. कीर्ती सुपे, अनिकेत इंगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पहिल्या दिवशी १० पेक्षा जास्त नागरिकांनी पिवळा ज्वर प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in