गणेशोत्सवात ‘राजकीय रंग’, मतदारराजापर्यंत पोहोचण्यासाठी नेत्यांना मंडळांचा ‘आधार’

विविध मंडळांच्या परिसरात फक्त आणि फक्त राजकीय नेतेमंडळींचे आणि राजकीय पक्षांचे पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग झळकत आहेत.
गणेशोत्सवात ‘राजकीय रंग’, मतदारराजापर्यंत पोहोचण्यासाठी नेत्यांना मंडळांचा ‘आधार’

मुंबई : पुढील सहा महिन्यांत लोकसभा, विधानसभेनंतर विविध महापालिकांच्या निवडणुका होण्याचे संकेत मिळत आहेत. विविध राजकीय पक्षांसह नेते आणि नगरसेवकांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवासारखी नामी संधी सोडतील ते राजकारणी कसले. मतदारराजाला आकर्षिक करण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा आधार घेतला आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील विविध मंडळांच्या परिसरात फक्त आणि फक्त राजकीय नेतेमंडळींचे आणि राजकीय पक्षांचे पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग झळकत आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी सर्वपक्षीय नेत्यांनी गणेशोत्सवात आपल्या प्रचाराचा नारळ फोडल्याचे चित्र जागोजागी दिसत आहे.

यंदाचा गणेशोत्सव राजकीय पक्ष आणि नेतेमंडळींसाठी प्रचारासाठी शेवटचा असणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवात मुंबईतील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत देखावे, सजावट पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्त मुंबईत येत असतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने १० दिवस मुंबईकरांच्या नजरेत राहण्यासाठी पोस्टर्स, होर्डिंग्ज व बॅनरबाजी सर्वात सोयीस्कर पर्याय उपलब्ध असतो. त्यामुळे गणेशोत्सवात सर्वपक्षीय नेते झळकत असून मतदारराजापर्यंत पोहोचण्यासाठी नेतेमंडळींनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा ‘टेकू’ घेतला आहे. प्रत्येक मंडळाच्या परिसरात मोठमोठे पोस्टर्स, बॅनर्स झळकत असून प्रचारासाठी यंदाचा गणेशोत्सव शेवटचा असल्याने नेतेमंडळींनी गणेशोत्सव मंडळांना पसंती दिली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपची साथ दिली आणि राज्यात एकत्र संसाराची गाडी हाकण्याचा निर्णय घेतला. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हेसुद्धा सत्तेतील सरकारमध्ये सामील झाल्याने राज्यात भाजप, शिंदेची शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर आहे.

महापालिकेत कमळ फुलवण्याचे प्रयत्न

गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा दबदबा असल्यामुळे त्यांना घेरण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. आगामी लोकसभा विधानसभेसह मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कमळ फुलवण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी रणनीती आखली आहे. मुंबईत १० दिवस गणेशोत्सवाची धूम असून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मोठा आधार आहे. गणेशोत्सव मंडळांना देणग्यांच्या स्वरूपात आर्थिक मदत लोकप्रतिनिधीनी केली आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांचे फोटो आणि पक्षांची चिन्हे गणेशोत्वात ठिकठिकाणी दर्शनी भागात झळकत आहेत. पोस्टर्स, बॅनरबाजीमुळे आपसुकच मतदारराजापर्यंत पोहोचण्याचा प्रचार व प्रसार होत आहे.

नेत्यांचे ब्रँडिंगवर लक्ष

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष आणि नेत्यांनी स्वत:चे ब्रँडिंग करण्यावर भर दिला आहे. तर अनेक नेत्यांनी बाप्पाच्या पूजेचे साहित्य घरपोच मोफत देत घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काही गणेशोत्सव मंडळांमार्फत राजकीय नेत्यांनी विविध कार्यक्रम आयोजित करून भरघोस बक्षिसे देत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in