प्रदूषणकारी बेकऱ्या, शेकोट्या रडारवर; २५ वॉर्डात प्रदूषण मापन २५० सेन्सर बसवणार

मुंबईतील प्रदूषणाचे मापन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची यंत्र आणि मुंबई महापालिकेने ५ यंत्र बसवले आहेत.
प्रदूषणकारी बेकऱ्या, शेकोट्या रडारवर;
२५ वॉर्डात प्रदूषण मापन २५० सेन्सर बसवणार

मुंबई : प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या २४ वॉर्डात प्रदूषण मापन २५० सेन्सर बसवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी आयआयटी कानपूर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून धूळ, धुरासह प्रदूषणकारी बेकऱ्या, शेकोट्या, बांधकाम ठिकाणची तपासणी करण्यात येणार आहे. २५० ठिकाणी बसवण्यात येणारे सेन्सर ८ ते १० प्रकारच्या प्रदूषणाची माहिती उपलब्ध करणार आहे. यामुळे मुंबईतील प्रदूषण नेमक्या कोणत्या कारणामुळे होते आणि त्यावर वेळीच नियंत्रण मिळवणे शक्य होईल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईतील प्रदूषणाचे मापन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची यंत्र आणि मुंबई महापालिकेने ५ यंत्र बसवले आहेत. या यंत्राच्या माध्यमातून त्या-त्या परिसरातील एक्यूआयची नोंद ठेवली जाते. मात्र अनेक ठिकाणी एक्यूआयची नोंद चुकीची येत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी यंत्रात बिघाड तर काही ठिकाणी योग्य नोंद होत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे मुंबई महापालिकेने आता स्वत: सेन्सर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आयआयटी कानपूरचे तंत्रज्ञान वापरण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हिवाळा सुरू झाला असून हिवाळ्यात प्रदूषणात वाढ होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे मुंबई महापालिकेने विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून बांधकाम ठिकाणी ३५ फूट उंच भिंत बांधणे स्प्रिंकलर बसवणे, धुळीचे कण पसरू नये यासाठी पडदे लावणे अशा २७ प्रकारची नियमावली २३ ऑक्टोबर रोजी जारी केली. मुंबईत सद्यस्थितीत सुमारे सहा हजारांवर बांधकामे सुरू आहेत. दरम्यान, प्रदूषण माजक यंत्रणांच्या नोंदीनुसार मुंबईच्या हवेचा दर्जा मोजला जात आहे. मात्र ही यंत्रे बसवलेल्या ठिकाणच्या स्थितीमुळेच हे प्रदूषण वाढत असल्याचे समोर आल्यामुळे ही यंत्रे बसवण्याची जागा बदलण्यात येणार असून सर्वसमावेश नोंद होईल, अशा ठिकाणी ही यंत्रे बसवण्यात येणार आहेत.

बिहार पटणात प्रयोग यशस्वी!

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार ‘सफर’ आणि पालिकेच्या पाच ‘एअर मॉनेटरिंग सिस्टिम’ मिळून मुंबईत २९ ठिकाणांची तपासणी ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ नोंद केली जाते. या यंत्रणेची परिणामकता वाढवण्यासाठी २५० ठिकाणी कायमस्वरूपी सेन्सर बसवून स्थानिक पातळ्यांवर होणारे प्रदूषण, त्याची कारणे शोधून उपाय केले जाणार आहेत. यासाठी कानपूर आयआयटीचे संशोधक सचिदानंद त्रिपाठी यांच्या माध्यमातून कार्यवाही केली जाणार आहे. आयआयटी कानपूरने याआधी बिहारच्या पाटणामध्ये हा प्रयोग यशस्वी केला आहे.

या पातळ्यांवर होणार तपासणी

बसवण्यात येणाऱ्या सेन्सरच्या माध्यमातून स्थानिक ठिकाणचे तापमान, आर्द्रता, धूळ, गाड्यांमधून निघणारा धूर, सल्फरडाय ऑक्साईड, कार्बनडाय ऑक्साईड यासह त्या त्या ठिकाणच्या प्रदूषणाची नेमकी कारणे यामुळे समजणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in