प्रदूषण नियंत्रणाचे नियम धाब्यावर; पाच हजार बांधकामांना पालिकेची नोटीस नियम पाळा अन्यथा बांधकाम ठिकाण 'सील'

मुंबईत पुन्हा एकदा प्रदूषणाचा स्तर उंचावल्याने दमा, खोकला अशा आजारांना आमंत्रण दिले जात आहे. वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी मुंबई पालिका प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने पाच हजार बांधकाम ठिकाणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
प्रदूषण नियंत्रणाचे नियम धाब्यावर;  पाच हजार बांधकामांना पालिकेची नोटीस नियम पाळा अन्यथा बांधकाम ठिकाण 'सील'
Published on

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा प्रदूषणाचा स्तर उंचावल्याने दमा, खोकला अशा आजारांना आमंत्रण दिले जात आहे. वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी मुंबई पालिका प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने पाच हजार बांधकाम ठिकाणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पालिकेच्या पर्यावरण विभागाने सर्व वॉर्डांत झाडाझडती सुरू केली असून नियमांकडे दुर्लक्ष केल्यास 'स्टॉप वर्क' नोटीस बजावण्यात येईल. नोटीस बजावल्यानंतर प्रदूषण रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या नाही, तर थेट बांधकाम ठिकाण 'सील' करण्याचा इशारा मुंबई पालिकेने बांधकाम करणाऱ्या विकासकांना दिला आहे.

मुंबईत ऑक्टोबर महिन्यानंतर प्रदूषणात वाढ होते. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून प्रदूषणात वाढ झाली आणि हवेची गुणवत्ता खालावल्याचे निदर्शनास आले होते. बांधकाम ठिकाणी उडणारी धूळ प्रदूषणास मुख्य कारण असल्याचे समोर आले होते. गेल्या वर्षीही प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई पालिकेने २७ प्रकारची नियमावली जारी केली होती. यात बांधकाम ठिकाणी पाण्याचा मारा करणे, बांधकाम ठिकाणी उंच पडदे लावणे, स्प्रिंक्लर बसवणे, बांधकाम ठिकाणचा राडारोडा वाहून नेताना बंद गाडीतून नेणे अशा २७ प्रकारची नियमावली जारी केली होती.

यंदाही प्रदूषणात वाढ झाली असून बांधकाम ठिकाणी धूळ हवेत पसरू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत.

जेवणासाठी चूल पेटवण्यास मनाई!

यंदाही बांधकाम ठिकाणी नियमांचे पालन होत नसल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच गेल्या वर्षी २७ प्रकारची नियमावली जारी केली होती. यंदा नियमावलीत दोन नियम वाढवले असून बांधकामाच्या ठिकाणी जेवण बनवण्यासाठी चूल पेटवणे आणि शेकोटी पेटवण्यासही बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी गेलेला कर्मचारी वर्ग पालिकेच्या सेवेत पुन्हा रुजू झाल्याने या कारवाईला वेग येणार आहे.

या नियमावलीचे पालन बंधनकारक!

धुळीने होणारे प्रदूषण रोखण्यासाठी एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभोवती किमान ३५ फूट उंचीचे लोखंडी / पत्र्यांचे आच्छादन असावे. संपूर्ण बांधकाम क्षेत्र ज्यूट किंवा हिरव्या कपड्याने झाकलेले असावे, बांधकामाच्या ठिकाणी स्प्रिंक्लर असावेत, धूळ उडू नये यासाठी दिवसातून किमान ४-५ वेळा पाण्याची फवारणी करावी, कामगारांना मास्क, चष्मा द्यावा.

रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी अॅण्टी स्मॉग मशीन लावावी, प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी स्वतंत्र वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा बसवावी.

logo
marathi.freepressjournal.in