
मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रात रस्त्यांची कामे सुरू असताना काही ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण केले जात आहे. मात्र, रस्त्याचे डांबरीकरण करत असताना रस्ते विभागाकडून वायू प्रदूषणाच्या २८ नियमांना केराची टोपली दाखवली जात आहे. रस्त्यावर चूल पेटवून त्यावर डांबर वितळवले जात आहे. परिणामी परिसरात धुराचे साम्राज्य पसरून विभागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचा दावा राज्य सरकार, महापालिका, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळीच आहे. मुंबईतल्या अनेक भागात रस्त्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र धुळीचे वातावरण निर्माण झाले आहे. आयुक्त भूषण गगराणी यांनी जरी रस्त्यावर खोदकाम कामास परवानगी नसल्याचे जगजाहीर केले असले तरी विविध माध्यमातून वायू प्रदूषनाला वाव मिळत आहे. मुंबईच्या अनेक रस्त्यांचे काम हे अर्धवट अवस्थेत तर काही रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. काही रस्त्यावर डांबरीकरण्याचे काम पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. पण हे डांबरीकरण सुरू असताना पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत.
प्रदूषण होऊ नये यासाठी कोणतेच प्रयत्न केले जात नसल्याचे समोर आले आहे. ज्या विभागात रस्त्याच्या डांबरीकरनाचे काम सुरू आहे, त्याठिकाणीच डांबर वितळण्याचे काम केले जाते. परिणामी, त्या विभागात धुराचे साम्राज्य निर्माण होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सदर प्रकार अधिकाऱ्यांच्या कानावर टाकायचे ठरवले तरीही अधिकारी स्वत:च्या वेळेनुसार काम सुरू असल्या ठिकाणी येत असल्याची माहिती येथील रहिवासी देतात.
ऐन उन्हाळ्यात धुराचे लोळ घरांपर्यंत
आम्ही जातो त्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. परिसरात फिरायचे म्हटले तर धुळीचा सामना करावा लागत आहे. लहान मुलाना बाहेर न्यायचे असले तरी मास्कचा वापर करावा लागतो. गेले कित्येक दिवस हीच परिस्थिती आहे. कडाक्याच्या उन्हात धुराचे लोळ घरांपर्यंत येत आहेत. याबद्दल कामगारांना विचारले असता, मोठ्या साहेबांना माहिती असल्याचे ते सांगतात. त्यामुळे रस्त्याच्या कामामुळेच आम्ही हैराण झालो आहोत. असे दादर येथील रहिवाशांनी यांनी सांगितले.
धुरापासून बचावासाठी साहित्य दिले जात नाही
प्रत्येक रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे की नाही याची माहिती नाही. परंतु, ज्या रस्त्याचे डांबरीकरण करायचे आहे ते आम्हाला सांगितले जाते. डांबरीकरण करताना कोणतेही अधिकारी आमच्या सोबत नसतात. किंवा धुरापासून बचावासाठी आम्हाला कोणतेच साहित्य दिले जात नसल्याची माहिती डांबर वितळवणाऱ्या कामगारांनी दिली.
शहरात वायू प्रदूषण होऊ नये यासाठी आम्ही प्रशासन स्तरावर सर्वोतपरी प्रयत्न करत आहोत. रस्त्याचे काम सुरू असतानाही सर्वांनी प्रदूषणाचे २८ नियम पाळणे बंधनकारक आहे. जर कोणी नियम पाळत नसेल तर त्याची माहिती घेऊन त्यावर पालिका प्रशासन योग्य तो निर्णय घेईल.
- अविनाश काटे, अनुज्ञापन अधीक्षक, मुंबई महानगरपालिका