
मुंबई : टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये हजारो धावपटू सहभागी होण्याच्या दोन दिवस आधी, एका पर्यावरण गटाने केलेल्या सर्वेक्षणात मॅरेथॉन मार्गावरील प्रदूषणाची पातळी अधिक असल्याचे आणि ती सुरक्षित मर्यादा ओलांडल्याचे आढळले आहे.
शहरातील आवाज फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी ‘सिटीझन्स सायन्स इनिशिएटिव्ह’ अंतर्गत शुक्रवारी सकाळी आठ ठिकाणी प्रदूषण पातळी मोजली. या आठ ठिकाणांपैकी एकाही ठिकाणी कणीय पदार्थ (पीएम २.५) पातळी प्राधिकरणांनी सुरक्षित मानलेल्या मर्यादेत नव्हती, असे फाऊंडेशनने सांगितले.
पूर्ण मॅरेथॉन (४२.१९ किमी) आणि अर्ध मॅरेथॉन (२१.०९ किमी) मार्ग दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून पश्चिम उपनगरातील वांद्रेपर्यंत आहे.
महानगरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर पायाभूत प्रकल्प सुरू असल्यामुळे हवेचे प्रदूषण ही गेल्या काही दिवसांपासून चिंतेची बाब बनली आहे. डिसेंबरमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकाने एक्यूआय २०० पुढे गेलेल्या भागांमध्ये बांधकाम क्रियाकलाप थांबवण्याचे आदेश दिले होते.
आवाज फाऊंडेशनच्या समन्वयक सुमैरा अब्दुलाली यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पालिकेला पाठवलेल्या पत्रात सांगितले की, शुक्रवारी सकाळी माहीम रेती बंदर येथे १५४ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर ही सर्वाधिक प्रदूषण पातळी नोंदवण्यात आली. हे ठिकाण अर्ध मॅरेथॉनच्या प्रारंभ ठिकाणापासून नजीक असून १५ हजार धावपटू सहभागी होणार आहेत.
मुंबईतील खान अब्दुल गफार खान रोड येथे ९५ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर ही सर्वात कमी प्रदूषण पातळी आढळली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकानुसार, पीएम २.५ साठी सुरक्षित मर्यादा २४ तासांसाठी ६० मायक्रोग्रॅम आहे.
पीएम २.५ म्हणजे व्यास २.५ मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी असलेले कण हे हवेच्या गुणवत्तेचे महत्त्वाचे निदर्शक आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार, पीएम २.५ साठी सुरक्षित मर्यादा १५ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आहे.
अटमॅस सेन्सर आधारित एअर क्वालिटी मीटर वापरून चाचण्या करण्यात आल्या. आठ ठिकाणी सकाळी ५ वाजल्यापासून ८.२७ वाजेपर्यंत प्रत्येकी पाच मिनिटांचे दोन स्वतंत्र वाचन नोंदवण्यात आले, असे पत्रात नमूद केले आहे. मॅरेथॉनमधील ६० हजारांहून अधिक सहभागींसाठी आरोग्यविषयक सूचना जारी कराव्यात आणि नागरिकांसाठी नियमित बुलेटिन प्रसिद्ध करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. आयोजक प्रोकॅम इंटरनॅशनल आणि टाटा यांनी धावपटूंना खराब हवेच्या गुणवत्तेबाबत आरोग्य जोखीम (सावधगिरी) समाविष्ट करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितींसाठी १६० हृदय आणि क्रीडा पुनर्वसन फिजिओथेरपिस्टचा समावेश असलेल्या वैद्यकीय पथकांना अंतिम १० किमीच्या अंतरावर तैनात करण्यात आले आहे.