
मुंबई : प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वास्तुकला या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अर्ज भरण्यास विद्यार्थांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थांना ३० जूनपर्यंत अर्ज भरता येणार आहे. त्यानुसार पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार पहिली गुणवत्ता यादी १२ जुलैला तर तात्पुरती गुणवत्ता यादी २ जुलैला जाहीर होईल.
तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. राज्यातील ४०० शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी सुमारे १ लाख ५ हजार जागा उपलब्ध आहेत. यंदा दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून प्रवेश प्रक्रियेला चांगला प्रतिसाद लाभत असल्याने पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी २ जुलै रोजी जाहीर होईल. या यादीवर हरकती नोंदविण्यासाठी विद्यार्थांना ३ ते ५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थांच्या हरकतीनंतर अंतिम गुणवत्ता यादी ७ जुलै रोजी प्रसिद्ध होईल.