शौचालयांच्या पुनर्बांधणीत कुचराई! कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आयुक्तांचे निर्देश

स्‍वच्‍छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात (वॉर्ड) व्यापक स्तरावर संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे
शौचालयांच्या पुनर्बांधणीत कुचराई! कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आयुक्तांचे निर्देश

मुंबई : सार्वजनिक प्रसाधनगृहांच्‍या पुनर्बांधणीचे काम दिलेल्या कालावधीत पूर्ण न करणाऱ्या अथवा कामात कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका, असे सक्त निर्देश मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंग चहल यांनी पालिकेच्या संबंधित यंत्रणेला दिले. तसेच रस्त्यांच्या दुतर्फा बेकायदा वाहन पार्किंग करणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून होणाऱ्या कारवाईत क्लीन-अप मार्शल मदतीला असणार, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांनी दिली.

मुंबईतील संपूर्ण स्‍वच्‍छता मोहिमेसाठी (डिप क्लिनिंग ड्राईव्ह) सविस्तर अशी मार्गदर्शक तत्त्वे तातडीने तयार करावीत. स्‍वच्‍छतेची परिणामकारक कार्यवाही करावी. पालिका यंत्रणेसमवेत लोकसहभागातून संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम यशस्‍वी होईल, अशा दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश चहल यांनी दिले आहेत.

स्‍वच्‍छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात (वॉर्ड) व्यापक स्तरावर संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे. या ‘डीप क्लिनिंग’ मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत रविवारी उत्‍तर विभागातील धारावीतून आणि डी विभागातून करण्‍यात आला होता. या संपूर्ण स्वच्छता मोहिमेत महानगरपालिकेचे सुमारे ५ हजार अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकदेखील सहभागी झाले होते. आता शनिवार, ९ डिसेंबर रोजी राबविण्‍यात येणाऱ्या संपूर्ण स्‍वच्‍छता मोहिमेच्‍या नियोजनाची आणि पूर्व तयारीची आढावा बैठक पालिका आयुक्त चहल यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी संपन्न झाली, त्‍यावेळी ते बोलत होते.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांच्‍यासह सर्व संबंधित परिमंडळांचे सहआयुक्त, उपआयुक्‍त, सहायक आयुक्‍त आणि संबंधित विभागांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

दर शनिवारी राबवल्या जाणाऱ्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेसाठी मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जारी करण्‍यात येतील. त्‍यानुसार, कृती आराखडा तयार करून नागरी स्‍वच्‍छतेची कार्यवाही केली जाईल. या स्वच्छ‍ता मोहिमेत लोकप्रतिनिधींसह, स्‍वयंसेवक, समाजातील ख्यातनाम व्यक्ती, उद्योजक, ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयीन तरूण, शालेय विद्यार्थी, अशासकीय संस्था, संघटना आदींनी मोठ्या संख्‍येने सहभागी होण्यासाठी आवाहन आणि नियोजन करावे, महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना देखील या मोहिमेमध्ये सामावून घ्यावे, असे चहल यांनी नमूद केले.

मुंबईत विविध ठिकाणी सार्वजनिक प्रसाधनगृह पुनर्बांधणी करण्‍याची महानगरपालिकेची कामे सुरू असून बांधकामांचा वेग वाढवा. पुनर्बांधणीचे काम दिलेल्या कालावधीत पूर्ण न करणाऱ्या कामात कुचराई मनमानी करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका, असे सक्त निर्देशही चहल यांनी दिले आहेत.

‘डीप क्लिनिंग’ मोहिम राबवणार!

डिसेंबर २०२३ आणि जानेवारी २०२४ या दोन महिन्‍यातील प्रत्‍येक शनिवारी, प्रत्येक परिमंडळात एक विभाग याप्रमाणे संपूर्ण स्वच्छता अर्थात ‘डीप क्लिनिंग’ मोहिम राबविली जाणार आहे. याकामी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्‍यात आली आहे. महानगरपालिकेच्‍या विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्‍या जबाबदारीचे वाटप करण्‍यात आले आहे. प्रत्येक परिमंडळातील एक विभाग (वॉर्ड) निवडून व्‍यापक स्‍तरावर व सखोल, सर्वांगीण स्‍वच्‍छता केली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in