
मुंबई : मोठ्या प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) गणेश मूर्तींसाठी पर्यावरणपूरक आणि पारंपरिकतेशी सुसंगत असे दीर्घकालीन धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले.
गणेशोत्सवात नैसर्गिक जलस्रोतांमध्ये पीओपी मूर्तींचे विसर्जन हे वादग्रस्त ठरले आहे, कारण प्लास्टर ऑफ पॅरिसला प्रदूषक मानले जाते. सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्याबाबत आयोजित उच्चस्तरीय बैठकीत फडणवीस यांनी सांस्कृतिक परंपरा आणि पर्यावरण संवर्धन यामधील संतुलन राखण्याचेमहत्त्व अधोरेखित केले.
“हे धोरण दीर्घकालीन पर्यावरणीय उपाययोजनांचा समावेश करणारे असावे आणि ते परंपरेशी सुसंगत असावे. तसेच हे कायदेशीर चाचणीही टिकवून ठेवू शकेल इतके सक्षम असावे,” असे फडणवीस यांनी बैठकीत सांगितले.
मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी मूर्तींच्या विसर्जनाबाबत काही निर्देश दिले होते. त्यानंतर राज्य सरकारने राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाकडून एक अभ्यास करण्याचे काम दिले. आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी सादर केलेल्या अहवालात मोठ्या मूर्तींसाठी खोल समुद्रात विसर्जनाच्या शक्यतेचा अभ्यास करण्याची शिफारस केली आहे.
दरम्यान, फडणवीस यांनी महापालिका अधिकाऱ्यांना विशेषतः समुद्रकिनाऱ्यांवर विसर्जनानंतर प्रभावी स्वच्छता मोहीम राबवण्याचे तसेच मूर्ती बनवण्यासाठी पर्यावरणपूरक साहित्य आणि नैसर्गिक रंगांचा वापर प्रोत्साहित करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीस उपस्थित असलेले सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लहान मूर्ती कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित कराव्यात आणि मूर्ती तयार करताना माती व टिकाऊ साहित्य वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी, असा सल्ला दिला.
डॉ. काकोडकर यांनी त्यांच्या अहवालात रासायनिक रंगांच्या पर्यावरणीय धोक्यांकडे लक्ष वेधले असून पाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी लोकजागृती आणि पर्यावरणपूरक मूर्तीनिर्मितीकडे वळण्याचे आवाहन केले आहे.
राज्य सरकार आता या शिफारशींचा आणि पुढील अभ्यासाचा विचार करून न्यायालयास आपली भूमिका कळवणार आहे.