आरबीआयकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता ; कर्जदारांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार

रिझर्व्ह बँकेने दोनदा मिळून रेपो रेटमध्ये ०.९० टक्के वाढ केली आहे.
आरबीआयकडून  व्याजदरात वाढ होण्याची शक्यता ; कर्जदारांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पुन्हा एकदा व्याजदरात वाढ होण्याचा अंदाज आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत रेपोरेट वाढण्याची शक्यता आहे. याआधीही रेपो रेटमध्ये वाढ केल्याने कर्जदारांचा ईएमआयचा बोजा वाढला आहे. रिझर्व्ह बँकेने दोनदा मिळून रेपो रेटमध्ये ०.९० टक्के वाढ केली आहे. आता पुन्हा एकदा व्याजदर वाढणार का याची काळजी नागरिकांना लागली आहे. कारण यावेळी आरबीआय रेपो रेटमध्ये २५ ते ५० बेसिस पॉइंट्सची वाढ जाहीर करू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

एकीकडे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत; मात्र डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे अडचणीत भर पडली आहे. आयात महाग झाली आहे. जूनमध्ये, किरकोळ महागाईचा दर आरबीआायच्या टॉलरन्स लेव्हल ६ टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे ७.०१ टक्के राहिला. त्याचवेळी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. फेडरल रिझर्व्हकडून रेपो दरात ७५ बेसिस पॉईंटने वाढ करू शकते.

रेपोरेटमध्ये २५ ते ५० बेसिस

पॉइंट्सने वाढ होण्याची शक्यता

सद्यस्थितीनुसार आरबीआय ऑगस्ट महिन्यात रेपोदरात २५ ते ५० बेसिस पॉइंट्सने वाढ करू शकते, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉईंट्सची वाढ होऊ शकते असे बँक ऑफ बडोदाला वाटत आहे. तर एचडीएफसी बँकेच्या मते, रेपो रेटमध्ये ५० बेसिस पॉइंट्सची वाढ शक्य आहे. याआधी दोन चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत आरबीआयने रेपोदरात ९० बेसिक पॉईंट्सची वाढ केली आहे. सध्या रेपो दर ४.९० टक्के आहे. व्याजदर आणखी वाढल्यास त्याचा फटका सर्व कर्जदारांसह अनेक क्षेत्रांना सहन करावा लागू शकतो.

जीएसटीमध्ये अनेक पॅकिंग जीवनावश्यक वस्तूंचा समावेश केल्याने त्या वस्तूचे दर वाढले आहेत. दही, पनीर, लस्सी, पीठ अशा काही वस्तूंचा जीएसटीमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांचे भारतीय रिझर्व्ह बँक व्याजदरात कितपत वाढ करते, याकडे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in