पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाला मुदतवाढ; २८ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन नोंदणीचे तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाला मुदतवाढ; २८ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार
Published on

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन नोंदणीचे तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २८ जानेवारीपर्यंत प्रवेश शुल्क व आवश्यक कागदपत्रे संकेतस्थळामार्फत भरता येणार आहेत.

एमडी, एमएस, डीएनबी या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षेमध्ये ५० टक्के मिळणे आवश्यक असते. मात्र जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा यासाठी वैद्यकीय विज्ञानमधील राष्ट्रीय परीक्षा मंडळाने पदव्युत्तर प्रवेशाच्या पात्रता निकषामध्ये बदल केला आहे. त्यानुसार पदव्युत्तर प्रवेशाच्या पात्रता निकषांमध्ये बदल करत पर्सेंटाईल १५ पर्यंत कमी केले आहे. या निकषानुसार पात्र विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेशाची संधी देण्यासाठी वेळापत्रकात पुन्हा बदल केला आहे. त्यानुसार कक्षाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

सुधारित वेळापत्रक जाहीर

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. सुधारित वेळपत्रकानुसार नव्याने पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी, प्रवेश शुल्क आणि आवश्यक कागदपत्रे २८ जानेवारी रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत संकेतस्थळावर अर्ज करता येईल. तसेच २८ जानेवारी रोजी तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी जागांचा तपशील संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २ हजार ५१० जागा असून २९ नोव्हेंबरपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची पहिली फेरी २९ नोव्हेंबरला झाली. तर २४ डिसेंबरपासून दुसरी फेरी राबविण्यात आली. दोन फेऱ्यांमध्ये या अभ्यासक्रमासाठी १ हजार ६९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, ८१६ जागा रिक्त राहिल्या आहेत. या जागांवर तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश होणार आहेत. आता ही प्रक्रिया फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in