पवई तलाव अखेर ओव्हरफ्लो...
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बुधवारी सकाळी पवई तलाव ओसंडून वाहू लागला.
तलावाची ५४५ कोटी लिटर एवढी जलधारण क्षमता असून या तलावाचे पाणी हे पिण्यायोग्य नाही. त्यामुळे हे पाणी औद्योगिक वापरासाठी व आरे दुग्ध वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कारणांसाठी वापरले जाते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे, अशी माहिती पालिकेने दिली.
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला पवई तलाव ओसंडून वाहू लागला आहे. जल अभियांत्रिकी विभागाच्या म्हणण्यानुसार, दोन दिवसांत तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे तलाव ओसंडून वाहू लागला आहे. तलावाची सध्याची पाण्याची पातळी १९५.१० फूट आहे. ५४५ कोटी लीटर पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या तलावातील पाणी पिण्यासाठी योग्य नाही. १८९० साली १२.५९ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेला तलावाचे पाणलोट क्षेत्र ६.६१ चौरस किलोमीटर आहे. जेव्हा तलाव पूर्णपणे भरतो तेव्हा पाण्याचे क्षेत्र सुमारे २.२३ चौरस किलोमीटर असते. तलावाची पूर्ण प्रवाह पातळी १९५ फूट आहे. तलाव पूर्णपणे भरतो तेव्हा त्यात ५४५.५ कोटी लिटर पाणी असते. तलाव पूर्ण भरला की त्याचे पाणी मिठी नदीत वाहून जाते.
धरणांतील पाण्यात वाढ
सततच्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. सोमवारी ८.६० टक्के असलेली पाण्याची पातळी मंगळवारी ९.७८ टक्क्यांपर्यंत वाढली. तर बुधवारी सकाळी पाण्याची पातळी १०.१९ टक्के इतकी होती. सद्यस्थितीत, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांमध्ये एकत्रित १,४७,४८८ दशलक्ष लीटर पाणीसाठा आहे.