
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवारी अखेरचा दिवस होता. दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरु असताना ४ वाजून ८ मिनिटांनी दक्षिण मुंबईतील वीजपुरवठा खंडित झाला. विधिमंडळातील वीजपुरवठा खंडित झाल्याने कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. नरिमन पॉइंट परिसरातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने ऐन उन्हाळ्यात लोकांचा घामटा निघाला. दरम्यान, २५ मिनिटांनी वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला आणि सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाले.
नरिमन पॉइंट येथील ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बुधवारी संध्याकाळी दक्षिण मुंबईतील काही भागात वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळी ४:०८ वाजता वीजपुरवठा खंडित झाला आणि तब्बल २५ मिनिटांनंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाला यश आले. नरिमन पॉइंट परिसरात कॉर्पोरेट कार्यालये, बँका, कायदेविषयक संस्थांची कार्यालये असल्याने कर्मचाऱ्यांना काही काळ ‘ब्रेक’ मिळाला.
‘बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक’ने (बेस्ट) दिलेल्या माहितीनुसार, नरिमन पॉइंट येथील ४५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मर तुटल्याने हा प्रकार घडला. साखर भवन आणि त्याच्या आसपासच्या परिसरात याचा परिणाम झाला. अधिकाऱ्यांनी पर्यायी केबल्स वापरून त्वरित वीजपुरवठा पूर्ववत केला. तसेच कप्लर स्विच करून सर्व प्रभावित भागात २० ते २५ मिनिटांत पुरवठा पूर्ववत करण्यात आला, असे बेस्टच्या अधिकाऱ्याने सांगितले.