पोयसर नदी घेणार मोकळा श्वास! मालाड ते कांदिवलीपर्यंत रुंदीकरण, खोलीकरण

तब्बल ४ कोटी ७८ लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावाला प्रशासनाची मंजुरी
पोयसर नदी घेणार मोकळा श्वास! मालाड ते कांदिवलीपर्यंत रुंदीकरण, खोलीकरण

मुंबई : पोयसर नदीचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. मालाड कुरार कल्व्हर्ट ते कांदिवली पूर्व येथील पश्चिम रेल्वे परिसरात नदीचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात येणार आहे. या कामामुळे कांदिवलीतील हनुमान नगर परिसर पूरमुक्त होणार आहे. या कामासाठी विविध करांसह तब्बल ४ कोटी ७८ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या प्रस्तावाला प्रशासनाने मंजुरी दिली आहे.

कुरार कल्व्हर्ट ते कांदिवली पूर्व पश्चिम रेल्वे परिसरातील हनुमान नगर हा मोठ्या लोकवस्तीचा भाग आहे. हा परिसर हा सखल असल्याने गेल्या काही वर्षांपासून मुसळधार पावसात येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. या स्थितीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी उपाययोजना करण्याची विनंती पालिका प्रशासनाकडे केली होती. त्याची दखल घेत पालिकेच्या कांदिवली आर. दक्षिण विभागातर्फे पोयसर नदीचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नदी पात्रालगतच्या काही झोपड्या या कामामुळे बाधित होत होत्या. या झोपडीधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून बाधित झोपड्या पाडण्यात आल्या आहेत.

या झोपड्यांच्या रिक्त जागी आता सुमारे ३०० मीटर इतक्या लांबीची संरक्षक भिंत बांधण्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. संरक्षक भिंतीच्या बांधकामामुळे पावसाळ्यात हनुमान नगर परिसराची पाणी तुंबण्यापासून मुक्तता होईल व पावसाळ्यात निर्माण होणारी पूरसदृश परिस्थिती काही अंशी आटोक्यात येऊन या भागातील रहिवाशांना दिलासा मिळेल, असा दावा पालिकेने केला आहे.

कंत्राटदार ३६.६३ टक्के कमी दरात काम करणार असून या कामासाठी चार कंत्राटदारांनी निविदा भरल्या होत्या. काम मिळवण्यासाठी कंत्राटदारांनी १७ ते ३६.६३ टक्के इतक्या कमी दरात काम करण्याची तयारी दर्शवली होती. लघुत्तम निविदाकार मे. आर्मस्ट्रॉग इंडिया कन्स्ट्रक्शन्स या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे.

या कामासाठी पालिकेने तपशीलवार तयार केलेल्या कार्यालयीन अंदाजावर पालिका सुधारित दरसूची २०२३ नुसार बनविण्यात आले आहे. कंत्राटदारास वस्तू व सेवा कराचे अधिदान हे त्यांनी नमूद केलेल्या दराच्या व्यतिरिक्त करण्यात येणार आहे. कंत्राटदाराकडून मागविण्यात आलेल्या दर विश्लेषणानुसार कंत्राटदारानी त्यांचा नफा सुमारे ७ टक्क्यांपर्यंत पर्यंत कमी केला असल्याचे पालिकेला कळविले आहे. कंत्राटदाराने कार्यालयीन अंदाजावर उद्धृत केलेले दर वाजवी आढळून आले आहे, त्यामुळे त्यांच्या निविदेची स्विकृतीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in