मुंबई : मुंबई महापालिकेची सर्वात महत्त्वाची समिती असलेल्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर तीन टर्म नगरसेविका राहिलेल्या राजेश्री शिरवडकर यांची शिक्षण समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
शिक्षण आणि स्थायी समितीच्या निवडणुकीत भाजपकडून शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजेश्री शिरवडकर यांचा एकमेव अर्ज आला होता, तर स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपचे प्रभाकर शिंदे यांचा एकमेव अर्ज आला होता.
मनसे गटनेते सत्ताधारी पक्षाच्या रांगेत बसले
मुंबई महापालिकेत अनेक नगरसेवक हे प्रथमच निवडणूक जिंकून नगरसेवक, तर कोणी गटनेते बनले, तर कोणी समिती अध्यक्ष बनले. मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार हे स्थायी समितीवर सदस्य असून ते स्थायी समितीच्या बैठकीत निवडणुकीपूर्वी चुकून सत्ताधारी भाजपच्या सदस्यांच्या रांगेत बसले. मात्र नंतर कोणीतरी सदर बाब त्यांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी जागा बदलून ते विरोधकांच्या रांगेत बसले.
एमआयएमचे गटनेते विरोधकांच्या रांगेत
एमआयएम पक्षाचे ८ उमेदवार यावेळी प्रथमच निवडणूक जिंकून नगरसेवक बनले. त्यांच्या पक्षाने विजय उबाळे यांना गटनेते जाहीर केले आहे. मात्र उबाळे यांनी स्थायी समितीवर जमीर कुरेशी यांचे सदस्य म्हणून नाव दिले होते. त्यामुळे कुरेशी अगोदरच स्थायी समितीच्या बैठकीत विरोधकांच्या रांगेत बसले होते. मात्र अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना विजय उबाळे हे सभेत आले आणि ते विरोधी पक्षाच्या रांगेत खुर्चीवर बसले. मात्र थोड्या वेळात सभागृहात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यावर चिटणीस विभागाच्या कर्मचाऱ्याने उबाळे यांच्या लक्षात चूक आणून देताच ते खुर्चीवरून उठले आणि सभागृहातून बाहेर गेले.
शिंदे स्थायी समितीचे ८१वे अध्यक्ष
भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे हे स्थायी समितीवर ८१वे अध्यक्ष ठरले. त्यांनी १३ वर्षे स्थायी समितीवर काम केले होते. त्यांनी शिवसेनेच्या २५ वर्षांच्या सत्ता कालावधीत काही वर्षे सभागृह नेते म्हणूनदेखील काम केले होते. २०१७ च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करून मुलुंड येथील मतदारसंघातून निवडणूक जिंकली. त्यावेळी त्यांनी भाजपचे गटनेते पदावर काम केले. मात्र २०२२ पासून चार वर्षे महापालिका निवडणूक झालेली नव्हती. मात्र यंदा १५ जानेवारी रोजी भाजपकडूनच निवडणूक लढवून त्यांनी निवडणूक जिंकली. आता यावेळी मात्र त्यांचे नशीब चमकले. भाजपने त्यांना स्थायी समिती अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यानुसार स्थायी समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने (ठाकरे) विरोधी पक्षाने उमेदवार न दिल्याने प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे महापौर रितू तावडे यांनी जाहीर केले.
स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर १९३३ ते १९५१ या कालावधीत २१ नगरसेवक अध्यक्ष होते. तसेच १९५२ ते १९७१ या कालावधीत २१ नगरसेवक, १९७२ ते १९९५ या कालावधीत २१ नगरसेवक अध्यक्ष होते. तर १९९६ ते २०२१ या कालावधीत १७ नगरसेवक असे आतापर्यंत ८० नगरसेवकांनी स्थायी समिती अध्यक्षपद भूषवले आहे.
कर निर्धारणाची छाननी करा - प्रभाकर शिंदे
मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत मालमत्ता कर आहे. मात्र मालमत्ता कर थकबाकीदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या करनिर्धारण विभागातील गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी दक्षता विभागाने कर निर्धारणाची काटेकोर छाननी करावी, अशी सूचना भाजपचे नगरसेवक नवनियुक्त स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.
मुंबई महापालिकेचे कर संकलनाचे प्रमाण एकूण उद्दिष्टापेक्षा ५० टक्के आहे. कर थकबाकीदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून ती वर्षानुवर्षं वाढत जाते. यामुळे याचा परिणाम मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होत आहे.
कर निर्धारण व संकलन विकास नियोजन विभाग, परवाने विभाग आणि पाणीपुरवठा विभाग हे पालिकेच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे आर्थिक स्रोत आहेत. या स्रोतांमध्ये वाढ करण्यासाठी आयुक्तांनी विविध उपाय योजनांचा विचार करावा, अशी सूचना त्यांनी केली.
मुंबईतील हरित क्षेत्रे अबाधित राहावी याकरिता स्थानिक प्रजातींचे वृक्ष, पाणथळ भागातील जलपर्णी यांचे संरक्षण करण्यासाठी धोरण राबवावे, यावरही त्यांनी भर दिला.
राजेश्री शिरवडकर बिनविरोध
शिक्षण समितीच्या निवडणुकीत भाजपकडून अध्यक्षपदासाठी दिलेल्या मुदतीत राजेश्री शिरवडकर यांचा एकमेव अर्ज आला होता. या निवडणुकीत विरोधात कोणीही अर्ज न भरल्याने पालिका नियमानुसार शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी राजेश्री शिरवडकर यांची बिनविरोध निवड करण्यात येत असल्याचे महापौर रितू तावडे यांनी जाहीर केले. राजेश्री शिरवडकर या तीन वेळा नगरसेवकपदावर निवडून आल्या असून त्यांनी स्थायी समितीवर सदस्य म्हणून काम केल्याने त्यांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आहे.
विद्यार्थ्यांसाठी वही,पेन द्या - राजेश्री शिरवडकर
शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या शुभेच्छा देताना कोणीही हार, पुष्पगुच्छ अथवा अन्य भेटवस्तू आणू नयेत. त्याऐवजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपयोगी ठरणारी पुस्तके, वह्या, लेखन साहित्य किंवा अन्य शैक्षणिक वस्तू शुभेच्छा किंवा भेट म्हणून आणाव्यात, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री राजेश शिरवडकर यांनी केले आहे.
हार-पुष्पगुच्छ क्षणिक सन्मानाचे प्रतीक असले, तरी विद्यार्थ्यांसाठी दिलेले शैक्षणिक साहित्य त्यांच्या शिक्षण व भविष्यासाठी अधिक उपयुक्त ठरते. या उपक्रमामुळे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना थेट शैक्षणिक मदत मिळून आवश्यक मूलभूत साधनांची पूर्तता होणार आहे. औपचारिक शुभेच्छांऐवजी शिक्षणात गुंतवणूक करण्याचा हा सकारात्मक व सामाजिकदृष्ट्या उपयुक्त संदेश असल्याचे शिरवडकर यांनी स्पष्ट केले आहे.
सत्ताधारी, विरोधी पक्षाकडून अभिनंदन
भाजपच्या नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांची शिक्षण समिती अध्यक्षपदी निवड झाल्यावर महापौर रितू तावडे, भाजपचे गटनेते आणि सभागृहनेते गणेश खणकर, शिवसेनेचे गटनेते अमेय घोले, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, काँग्रेस पक्षाचे गटनेते अश्रफ आजमी, मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या डॉ. सईदा खान, बेस्ट समितीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार तृष्णा विश्वासराव, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक यशोधर फणसे, ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव आदींनी पुष्पगुच्छ देऊन स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांचे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचे अभिनंदन केले. निवडणुकीत विरोधात कोणीही अर्ज न भरल्याने पालिका नियमानुसार शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी राजेश्री शिरवडकर यांची तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रभाकर शिंदे यांची निवड करण्यात आल्याचे महापौर रितू तावडे यांनी जाहीर केले.