

मुंबई : स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाची माहिती अतिरिक्त आयुक्तांकडे असतेच असे नाही. काही वेळा संबंधित विभागातील अधिकारी माहिती देतात. परंतु त्या त्या विभागाचे एचओडी कधीच हजर नसतात. त्यामुळे सदस्यांना पुरेशी माहिती मिळत नाही. सदस्यांनी उपस्थित केलेला मुद्दा गंभीर असून या पुढे बैठकीत एचओडीना हजर राहण्याचे आदेश पालिका प्रशासनाने द्यावे, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले.
दर आठवड्याला बुधवारी स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात येते. या बैठकीत मुंबईकरांशी निगडीत प्रश्न उपस्थित करण्यात येतात. स्थायी समिती अध्यक्षांच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरे मिळणे अपेक्षित असते. स्थायी समितीत विविध मुद्द्यांवर चर्चा होते आणि तीन ते चार तास चर्चा घडून येते. अशा वेळी समिती अध्यक्ष, सदस्य अतिरिक्त आयुक्त, पत्रकार सगळे बसलेले असतात. संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित असतात.
मात्र, त्या त्या विभागाचे प्रमुख उपस्थित नसल्याने अतिरिक्त आयुक्तांना पुढील बैठकीत माहिती देतो असे सांगण्याची वेळ ओढवते, असा मुद्दा स्थायी समिती सदस्य यामिनी जाधव यांनी उपस्थित केला.