‘प्रजा फाऊंडेशन’च्या अहवालाच्या उद्देशाची होणार चौकशी; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

संस्थेने अशा पद्धतीने अहवाल सादर का केला याची प्रथम चौकशी करू ? तसेच संस्थेचा उद्देश काय हेही तपासून पाहिजे जाईल
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईतील शौचालय चालकांचा मनमानी कारभार आणि इतर असुविधांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येईल. तसेच मुंबईतील शौचालयांबाबत ‘प्रजा फाऊंडेशन’ संस्थेचा अहवाल आणि वस्तुस्थितीमध्ये फरक आहे. त्यामुळे ‘प्रजा फाऊंडेशन’ संस्थेच्या अहवालाची चौकशी करू, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. मुंबईत लोकसंख्येच्या तुलनेत शौचालयांची संख्या अत्यंत कमी असल्याबाबत आमदार सुनील शिंदे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. अनेक शौचालयांची दुर्दशा झाली असून ती कधीही पडू शकतात. तसेच काही शौचालयांमध्ये वीज, पाणी उपलब्ध नाही. तर काही संस्थाचालक मनमानी भाडे आकारत असून काही गुंडांनी शौचालये ताब्यात घेऊन त्याला टाळे ठोकले असल्याबाबत शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला.

यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, ‘प्रजा फाऊंडेशन’ संस्थेचा अहवाल तपासून पहिला पाहिजे. मुंबईत सार्वजनिक शौचालये १० हजार ६८४ आहेत. त्यावर शौचकुपे १ लाख ५९ हजार ३६ आहेत. त्यामुळे अहवाल आणि वस्तुस्थितीमध्ये फरक आहे. या संस्थेने अशा पद्धतीने अहवाल सादर का केला याची प्रथम चौकशी करू ? तसेच संस्थेचा उद्देश काय हेही तपासून पाहिजे जाईल आणि ज्या शौचालयांना वीज, पाणी नाही. त्यांना वीज, पाणी जोडणी करण्याचे निर्देश पालिकेला देण्यात येतील, अशी माहिती सामंत यांनी दिली.

आमदार प्रवीण दरेकर यांनी ‘प्रजा फाऊंडेशन’ संस्था आमदार, नगरसेवक यांना प्रथम क्रमांक देतात. यामध्ये यंत्रणेला बदनाम केले जाते. त्यामुळे ‘प्रजा फाऊंडेशन’ संस्थेची चौकशी करावी तसेच संस्थेने आतापर्यंत केलेल्या कृतीचा आराखडा सभागृहात ठेवणार का ? असा सवाल उपस्थित केला. यावर सामंत यांनी संस्थेच्या अहवालाची चौकशी करून त्यांचा हेतू शोधून काढू, असे उत्तर दिले.

तसेच मुंबईतील शौचालयांच्या दुरवस्थेबाबत शौचालयांची मोहीम राबविण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला देण्यात येतील. तसेच संस्थांचालकांचा सुरु असलेला मनमानी कारभार आणि गुंडांनी ताब्यात घेतलेली शौचालये सार्वजनिक करण्यात येतील, असे सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in