
मुंबई : अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या ताब्यात असलेल्या व मान्यताप्राप्त असलेल्या बेस्ट कामगार संघटनेच्या दी इलेक्ट्रिक युनियनच्या अध्यक्षपदी, भाजपचे विधान परिषद सदस्य आणि श्रमिक उत्कर्ष सभेचे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
बेस्ट उपक्रमाच्या दी इलेक्ट्रिक युनियनच्या पाच हजार कामगारांनी निवड केली असून, कित्येक वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडे असलेली ही युनियन आता भारतीय जनता पार्टी आणि आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. श्रमिक उत्कर्ष सभेचा अध्यक्ष या नात्याने कार्यरत असल्याने, हे नेतृत्व मान्य करण्यात आल्याचे मत आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे आजवर वेगळ्या विचारधारेने काम करणाऱ्या ईपीएफ स्टाफ युनियन महाराष्ट्र (रजि.) म्हणजेच भविष्य निधी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देखील लाड यांच्याकडे सोपवण्यात आली असून, या जबाबदारीच्या माध्यमातून कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे मत प्रसाद लाड यांनी व्यक्त केले आहे.
मुंबईतील अनेक कामगार संघटना यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत होत्या, परंतु आता हे चित्र बदलताना दिसत असून, बेस्टच्या दि इलेक्ट्रिक युनियनच्या अध्यक्षपदी प्रसाद लाड यांची निवड झाल्यामुळे, उद्धव ठाकरे गटाला एकप्रकारे धक्का बसला आहे. यापूर्वी ठाकरे गटाचे सुहास सामंत यांच्याकडे हे अध्यक्षपद होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत आणि मान्यताप्राप्त भविष्य निधी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी लाड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.