मोस्ट वॉण्टेड गँगस्टर प्रसाद पुजारीला मोक्का; चीनमध्ये व्यावसायिक असल्याचे भासवून तपास यंत्रणेची दिशाभूल

गेल्या २० वर्षांपासून प्रसादचा मुंबई पोलिसांकडून शोध सुरु होता. त्याच्याविरुद्ध मुंबईसह नवी मुंबई आणि ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पूर्वी तो कुमार पिल्ले टोळीसाठी काम करत होता.
मोस्ट वॉण्टेड गँगस्टर प्रसाद पुजारीला मोक्का; चीनमध्ये व्यावसायिक असल्याचे भासवून तपास यंत्रणेची दिशाभूल

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि कुमार पिल्ले टोळीपासून फारकत घेतल्यानंतर स्वत:ची टोळी बनवून गुन्हेगारी जगतात स्वत:च्या टोळीचा दबदबा निर्माण करणाऱ्या मोस्ट वॉण्टेड गँगस्टर प्रसाद उर्फ सुभाष विठ्ठल पुजारी ऊर्फ सिद्धार्थ शेट्टी ऊर्फ सिद्धू ऊर्फ जॉनी याला विक्रोळीतील गोळीबारप्रकरणी मोक्का कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला विशेष सत्र न्यायालयाने चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रसाद पुजारीवर आठहून अधिक गुन्ह्यांची नोंद असून या आठही गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेसह खंडणीविरोधी पथकाकडे आहे. त्यामुळे त्याचा इतर गुन्ह्यांत लवकरच ताबा घेतला जाणार आहे. चीनमधून प्रत्यार्पण झालेला प्रसाद पुजारी हा पहिलाच गँगस्टर असून तो चीनमध्ये व्यावसायिक असल्याचे भासवून तपास यंत्रणेची दिशाभूल करून वास्तव्य करून राहत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

गेल्या २० वर्षांपासून प्रसादचा मुंबई पोलिसांकडून शोध सुरु होता. त्याच्याविरुद्ध मुंबईसह नवी मुंबई आणि ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पूर्वी तो कुमार पिल्ले टोळीसाठी काम करत होता. कुमार पिल्लेनंतर तो छोटा राजन टोळीत सामिल झाला होता. या दोघांशी झालेल्या मतभेदानंतर प्रसादने स्वत:ची टोळी बनवून त्याच्या सहकाऱ्याच्या मदतीने मुंबई, ठाणे, नवी मुंबईत टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. डिसेंबर २०१९ रोजी विक्रोळीतील शिवसेनेचे पदाधिकारी आणि व्यावसायिक चंद्रकांत जाधव यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात प्रसादचे नाव समोर आले होते. गुन्हेगारी जगतात स्वत:च्या टोळीचा दबदबा निर्माण करण्यासाठी त्याने त्याच्या सहकाऱ्याच्या मदतीने हा गोळीबार घडवून आणला होता. त्यानंतर त्याने अनेक प्रतिष्ठित निर्माता-दिग्दर्शक, कलाकारांकडे खंडणीची मागणी करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त होताच मुंबई पोलिसांनी प्रसादसह त्याच्या टोळीविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. त्याच्या बहुतांश सहकाऱ्यांना अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली होती. यातील काही गुन्ह्यांत त्याच्या सहकाऱ्यांना शिक्षा झाली आहे तर काही प्रकरणे अद्याप न्यायप्रविष्ट आहेत. या बहुतांश गुन्ह्यांत प्रसादला वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले होते. २००४ साली त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. एक वर्ष जेलमध्ये राहिल्यानंतर २००५ साली त्याची जामिनावर सुटका झाला होती. त्यानंतर तो मुंबई सोडून परदेशात पळून गेला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in