दहिसर टोलनाक्यासाठी १३ नोव्हेंबरची डेडलाईन; नाही हटवला तर मीच उखडून टाकीन- प्रताप सरनाईक

दहिसर टोलनाका महामार्गावर स्थलांतरित करण्यास भाजपाने विरोध व्यक्त केलेला असताना, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी दहिसर टोलनाक्याची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना १३ नोव्हेंबरपर्यंत टोलनाका हटवण्याची अंतिम मुदत दिली. या मुदतीत कारवाई न झाल्यास 'टोलनाका स्वतः उखडून टाकीन,' असा कडक इशारा त्यांनी दिला.
दहिसर टोलनाक्यासाठी १३ नोव्हेंबरची डेडलाईन; नाही हटवला तर मीच उखडून टाकीन- प्रताप सरनाईक
दहिसर टोलनाक्यासाठी १३ नोव्हेंबरची डेडलाईन; नाही हटवला तर मीच उखडून टाकीन- प्रताप सरनाईक
Published on

भाईदरः दहिसर टोलनाका महामार्गावर स्थलांतरित करण्यास भाजपाने विरोध व्यक्त केलेला असताना, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी दहिसर टोलनाक्याची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना १३ नोव्हेंबरपर्यंत टोलनाका हटवण्याची अंतिम मुदत दिली. या मुदतीत कारवाई न झाल्यास 'टोलनाका स्वतः उखडून टाकीन,' असा कडक इशारा त्यांनी दिला.

दहिसर टोलनाक्यावरून निर्माण होणारी वाहतूककोंडी ही गंभीर समस्या बनली आहे. ही समस्या दूर करण्यासाठी टोलनाक्याचे स्थलांतर करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना टोलनाका स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत. पर्याय म्हणून वरसावे महामार्ग किंवा खाडी पुलाच्या पलीकडे टोलनाका नेण्याचा प्रस्ताव समोर आला. मात्र मीरा-भाईंदर भाजपसह वनमंत्री गणेश नाईक यांनी याला सार्वजनिकरित्या विरोध दर्शवला आहे. परिणामी या विषयावर शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात संघर्ष उभा राहिला आहे.

शनिवारी सकाळी मंत्री सरनाईक यांनी दहिसर टोलनाक्याची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी मुंबई पोलीस, महापालिका, राज्य रस्ते विकास महामंडळ, मीरा-भाईंदर महापालिका, वाहतूक विभाग तसेच टोल ठेकेदार कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

तथापि, त्यांच्या आदेशानंतरही प्रत्यक्षात केवळ एका बाजूची फ्रेम काढण्यापलीकडे इतर काहीही काम झाले नसल्याचे पाहणीदरम्यान लक्षात आले. काही अधिकाऱ्यांनी अतिरिक्त मुदत मागितल्यावर सरनाईक तीव्र नाराजी व्यक्त करत म्हणाले, 'मी १३ नोव्हेंबर रोजी पुन्हा पाहणीस येईन. त्यावेळी ही स्थितीच दिसली तर टोलनाका मी स्वतः तोडून टाकेन.'

पाहणीदरम्यान सरनाईकांना विरोध

टोलनाक्याचे स्थलांतर करण्यासाठी वरसावे खाडीपूल पलीकडील वसई परिसराची पाहणी करण्यासाठी सरनाईक हे अधिकाऱ्यांसह गेले असता, काँग्रेसचे विजय पाटील, त्यांचे पुतणे सुशांत पाटील आणि इतर काही नागरिकांनी विरोध दर्शवला. 'राष्ट्रीय महामार्गावर मुंबईचा प्रवेशबिंदू असलेला टोलनाका वसईत कसा काय आणणार? येथील रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूककोंडीमुळे लोक आधीच त्रस्त आहेत. मुंबईचा टोलनाका येथे मान्य होणार नाही,' असा इशारा त्यांनी दिला.

वाहनांसाठी रस्ता खुला करा

मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील टोलनाक्याजवळील डिव्हायडर काढून वाहनांसाठी रस्ता खुला करण्याचे आदेश सरनाईक यांनी दिले. तसेच रस्त्यात ठेवलेली क्रेन, बाकडी इत्यादी वस्तू हटवून मार्ग पूर्णपणे मोकळा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याशिवाय टोलनाक्यावरील अनावश्यक जाहिरातफलक, फ्रेम, अवजड लोखंडी खांब, अतिरिक्त बूथ इत्यादी हटवून केवळ वाणिज्य वाहनांसाठी आवश्यक तेवढे बूथ ठेवण्याचेही आदेश त्यांनी संबंधितांना दिले. मुंबईहून मीरा-भाईंदरकडे येणाऱ्या मार्गावरील टोलनाका पुढे ढकलण्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in