हिंदी ही मुंबईची बोली भाषा; सरनाईक यांच्या विधानावर चौफेर टीका

राज्यात मराठी भाषेला परप्रांतियांकडून विरोध केला जात असताना आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी ही मुंबईची बोली भाषा आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय पक्षांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटून अनेकांनी नाईक यांच्यावर टीका केली आहे.
हिंदी ही मुंबईची बोली भाषा; सरनाईक यांच्या विधानावर चौफेर टीका
एक्स @PratapSarnaik
Published on

मुंबई : राज्यात मराठी भाषेला परप्रांतियांकडून विरोध केला जात असताना आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी ही मुंबईची बोली भाषा आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय पक्षांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटून अनेकांनी नाईक यांच्यावर टीका केली आहे.

मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, ठाणे आणि मिराभाईंदर माझा मतदारसंघ आहे. जेव्हा मी ठाण्यात बोलतो तेव्हा मी माझ्या मतदारांशी मराठीत बोलतो. मराठी ही आमची मातृभाषा आहे, आमची आहे. पण, हिंदी आमची लाडकी बहीण आहे. या लाडकी बहिणीमुळे आम्ही २३७ जागांवर निवडून आलो आहोत.

हिंदी ही मुंबईची बोलीभाषा बनली आहे. हिंदी बोलत असताना मध्येच एखादा शब्द मराठी किंवा इंग्रजी भाषेतील येतो, असेही ते म्हणाले.

प्रताप सरनाईक यांच्या या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून सरनाईक यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली. उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत म्हणाले की, मराठी माणसाच्या कल्याणासाठी आणि आत्मसम्मानासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. आपण बाळासाहेबांचे वारसदार आहोत असे म्हणणारेच आता अशी विधाने करीत आहेत. त्यांच्या नेत्यांना विचारा की यावर तुमची भूमिका काय आहे? मराठीबाबत हीच तुमची भूमिका आहे का? हा विचार भाजपचा आहे, अमित शहांचा आहे. म्हणून मी वारंवार म्हणतो की त्यांच्या पक्षाचा नेते अमित शहा आहेत. त्यामुळे शाह जे काही बोलतात तेच हेही बोलतात, अशी टीका राऊत यांनी केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या नाईक यांच्या वक्तव्यावर सावध प्रतिक्रिया दिली. मराठीचा वापर व्हावा, हा सरकारचा निर्णय आहे. कुणाला काय आवडते हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु सरकारच्या आदेशाचे पालन झाले पाहिजे, असे राणे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in