प्रतिबाळासाहेब आकर्षण

या मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांची काँग्रेसवर टीका करणारी क्लिप दाखवण्यात येत होती.
प्रतिबाळासाहेब आकर्षण
Published on

बंडखोरीनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या शिंदे गटाच्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच, बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावर शिवसैनिकांचा मोठा जनसागर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला लोटला होता. राज्यभरातून शिंदेसमर्थक मोठ्या संख्यने बीकेसीत दाखल झाले होते. या मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे दिसणारे ७० वर्षीय दिव्यांग भगवान शेवडे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते.

या मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांची काँग्रेसवर टीका करणारी क्लिप दाखवण्यात येत होती. ज्यात बाळासाहेबांनी काँग्रेसशी हातमिळवणी करणार नसल्याचे सांगितले होते. ‘बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा उद्धव ठाकरेंनी कसा विश्वासघात केला,’ हेही दाखवण्यात येत होते. एकनाथ शिंदे मंचावर आल्यावर लोकांनी उभे राहून जल्लोष केला. एकनाथ शिंदे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या खुर्चीला पुष्प अर्पण केले. बाळासाहेब ठाकरे ठाणे दौऱ्यावर आले होते त्यावेळी ज्या खुर्चीवर बसले होते. ती खुर्ची मंचावर आणण्यात आली होती.

स्मिता ठाकरे यांची सून आणि मुलगा निहाल ठाकरे यांनीही शिंदे यांच्या सभेला हजेरी लावली. स्मिता ठाकरे म्हणाल्या की, “मी शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला जायची. पण बाळासाहेबांच्या निधनानंतर मेळाव्याला जाणे बंद केले. बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेणारी व्यक्ती म्हणजे एकनाथ शिंदे आहे, हा माझा विश्वास आहे.” त्यामुळे शिंदे यांच्या समर्थनार्थ पुढे या, असे आवाहनही त्यांनी केले.

बाळासाहेबांचे पुत्र जयदेव ठाकरे यांनीही या मेळाव्याला उपस्थिती लावली. यावेळी ते म्हणाले, “एकनाथ हे माझे आवडते नेते आहेत, आता ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, म्हणून मी त्यांना ‘एकनाथराव’ म्हणेन. त्यांना एकटे पाडू नका. त्याला ‘एकटानाथ’ बनवू नका. नव्याने निवडणुका होऊ द्या, महाराष्ट्रात ‘शिंदे सरकार’ निवडून आणू. माझे आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी आहेत.”

दहिसरच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. मुंबईतील खराब रस्ते आणि खराब पायाभूत सुविधांसाठी त्यांनी शिवसेनेला जबाबदार धरले. किशोरी पेडणेकर यांनी कोविड काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांनी केला. कोविड रुग्णांच्या जेवणाची बिले कुठे गायब झाली, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

“माझ्या वडिलांची चोरी झाल्याचा आरोप होत आहे, हे दुर्दैव आहे. आम्ही कोणाच्या वडिलांची चोरी केलेली नाही, असे सांगतानाच आदित्य ठाकरे हे मुंबई महानगरपालिकेच्या खोक्यावर मोठे झाले आहेत. त्यांनी ‘खोके’ असा जयघोष करत पक्ष सोडलेल्या इतरांवर दोषारोप करू नये, अशी टीका खासदार राहुल शेवाळे यांनी केली. उद्धव ठाकरे यांचे मुंबईत ऑपरेशन झाले तेव्हा आदित्य ठाकरे स्वित्झर्लंड आणि लंडनला होते. युरोपमधील पबमध्येही ते वेळ घालवत होते, असा आरोप शेवाळे यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in