
तेजस वाघमारे/मुंबई
‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या वडाळा येथील विठ्ठल मंदिराच्या विकासाकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. सुमारे वर्षभरापूर्वी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मंदिर व आसपासच्या परिसर विकासाला २५ कोटी मंजूर झाल्याचे म्हटले होते. तथापि, विठ्ठल मंदिर परिसर आजही सुशोभीकरणापासून कोसोदूर असल्याचे दिसत आहे. पंढरपूर विठ्ठल मंदिराप्रमाणे सरकारने वडाळा विठ्ठल मंदिराच्या विकासाकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिकांकडून होऊ लागली आहे.
ऊन, वारा, पावसाची भीडभाड न बाळगता लाखो वारकरी महिनाभर चालत पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भेटीला जातात. मात्र नोकरी, उद्योगामुळे पंढरपूरला जाता येत नाही, असे असंख्य भाविक वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन धन्य होतात. आषाढी एकादशीनिमित्त मुंबईतील वडाळा मंदिरात भाविकांची अलोट गर्दी होते.मुंबईच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येथे येतात. अनेक भागातून आजही दिंड्या विठ्ठल मंदिरात येतात.
मंदिरात चै. शु. प्रतिपदेपासून (गुढीपाडवा) फाल्गुन पोर्णिमा म्हणजेच होळी पोर्णिमेपर्यंत वर्षभर धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रम सुरू असतात. त्यामध्ये वारकरी मंडळींचे हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण होत असतात. श्रीराम जन्मोत्सव चै. शु. त्रयोदशीला श्री विठ्ठलाचा वर्धापनदिन, श्री हनुमान जयंती त्याचप्रमाणे आषाढी एकादशी हा अत्यंत महत्वाचा उत्सव साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने मुंबापुरीतील वडाळ्यात प्रतिपंढरपूर म्हणून नावाजलेल्या या विठ्ठल मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करीत असतात.
या निमित्ताने वडाळ्याच्या या प्रतिपंढरीत मोठी जत्रा भरविण्यात येते. विविध प्रकारची दुकाने त्याचप्रमाणे मुलांसाठी करमणुकीची साधने, पाळणे येथे असतात. श्री विठोबा महादेव गणपती मंदिर ट्रस्टकडे या उत्सवाची जबाबदारी असते. आषाढी एकादशीची दशमीपासून सुरुवात होते. दशमीला अभिषेक झाला की यात्रा सुरू होते.
चंद्रभागेत सापडली विठ्ठल मूर्ती
मुंबापुरीतील वडाळा गावातील असंख्य वारकरी भक्त विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपुरास पायी वारीने जात असत. सुमारे ४०० वर्षांपूर्वी असेच वारकरी भक्त पंढरपुरास गेले असता चंद्रभागेत त्यांच्यापैकी एका भक्ताला एक दगड दिसला. तो दगड सर्व भक्तांनी मिळून बाहेर काढला आणि सर्व भक्तांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण तो दगड नसून श्री विठ्ठलाची मूर्ती होती. त्या सर्व भक्त्तांनी ती विठ्ठलाची मूर्ती वडाळा गावात आणली आणि तिची प्राणप्रतिष्ठा केली. तो दिवस म्हणजे चैत्र शु. त्रयोदशी. या व अशा अनेक आख्यायिका मंदिराबाबत सांगण्यात येतात. परंतु विठ्ठलाची मूर्ती सुमारे ४०० हून अधिक वर्षांची असावी याला एकच पुरावा आहे. तो म्हणजे मंदिराच्या बाहेर धर्मशाळा म्हणून बांधण्यात आलेल्या वास्तूच्या भिंतीवरील शिलालेखावर सन १६०१ असा उल्लेख आहे.
केवळ बॅनर लागले, काम झाले नाही!
विठ्ठल मंदिरासाठी निधी मंजूर झाल्याचे बॅनर शिवसेना शिंदे गटाने विभागात लावले. त्यातील एका रुपयाचेही काम झालेले नाही. वडाळा विठ्ठल मंदिरास ‘प्रति पंढरपूर’ म्हणतात. पंढरपूरच्या तुलनेत इथे कोणत्याही सुविधा नाहीत. मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या घरांचे पुनर्वसन होणार होते. याचेही काम झालेले नाही. त्यानंतर येथील जागेचा विकास होणार होता. येथे आषाढीला मोठी गर्दी होते. वारकरी हे पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुर असतात. त्यांची या ठिकाणी गैरसोय होते. त्यामुळे विठ्ठल मंदिर परिसराचा विकास होणे गरजेचे आहे.
- आनंद प्रभू (भाविक)
कुणीही आमच्या संपर्कात नाही!
संत तुकाराम महाराजांनी विठ्ठल मंदिर मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. या मंदिराच्या कॉरिडोरसाठी निधी देण्याचे महायुती सरकारने जाहीर केल्याबाबत मी ऐकले आहे. मात्र, याबाबत आमच्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही.
- नितीन म्हात्रे (खजिनदार,
श्री विठोबा महादेव गणपती मंदिर ट्रस्ट)