प्रवीण हे संजय राऊतांचे फ्रंटमॅन ईडीचा कोर्टात दावा
मुंबई : गोरेगावच्या सिद्धार्थनगर येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर करताना सत्र न्यायालयाच्या पीएमएलए न्यायालयाने आपले अधिकार क्षेत्र ओलांडून तथाकथित गुन्ह्याविरुद्ध आदेश दिल्याचा दावा ईडीने गुरुवारी मुंबई हायकोर्टात केला. ईडीच्या वतीने माजी सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी हा दावा करताना प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे फ्रंटमॅन असल्याचेही सांगितले.
गुरुवारची सुनावणी अपूर्ण राहिल्याने न्यायालयाने सोमवारी सायंकाळी या प्रकरणी पुन्हा सुनावणी निश्चित केली आहे. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राज्यसभा खासदार संजय राऊत यांना १ ऑगस्ट २०२२ रोजी अटक करण्यात आली होती. तब्बल १०२ दिवसांनी त्यांना पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्या निर्णयाला ईडीने हायकोर्टात आव्हान दिले असून या केंद्रीय तपास यंत्रणेच्या अपीलावर न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्यासमोर गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी ईडीच्या वतीने अॅडव्होकेट जनरल अनिल सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाने विविध खटल्यांमध्ये दिलेल्या निकालांचा संदर्भ देत आर्थिक अफरातफरीचा गुन्हा अधिक गंभीर असल्याचा दावा केला.
तसेच सर्वोच्च न्यायालयाने विविध प्रकरणात दिलेल्या निकालाचा संदर्भ देत संजय आणि प्रविण राऊत यांचा या गुन्ह्यात अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न करताना मनीलाँड्रिंगच्या गुन्ह्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.