पाणी उपसा पंप यंदा तारणहार ठरणार का?  

मध्य रेल्वेची सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी मान्सूनपूर्व कामे युद्धपातळीवर सुरू
पाणी उपसा पंप यंदा तारणहार ठरणार का?  

पावसाळ्याच्या दिवसात रेल्वेसेवा विस्कळीत होण्याच्या घटना सर्रास घडतात. परिणामी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेत महापालिका आणि रेल्वे प्रशासनाद्वारे युद्धपातळीवर मान्सूनपूर्व कामे केली जातात. उपनगरीय रेल्वे मार्गांवर रेल्वेच्या हद्दीत नालेसफाई, मोऱ्यांची (कल्व्हर्ट) सफाई करण्यात येते. सद्यस्थितीत मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर विविध मान्सूनपूर्व कामे सुरू आहेत. अशातच गतवर्षी मध्य आणि हार्बर मार्गावर पावसाचे पाणी साचू नये म्हणून सुमारे २८ ठिकाणी साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा उपसा करणारे पंप बसविण्यात आले. तरी देखील काही ठिकाणी पाणी साचून रेल्वेसेवा विस्कळीत होण्याच्या घटना घडल्या. याचा प्रवाशांना फटका बसून लेटमार्कला सामोरे जावे लागले. दरम्यान, यंदा आवश्यक सुधारणा करत मध्य रेल्वेवरील सेवा विस्कळीत होण्यापासून वाचवण्यासाठी उपसा पंप तारणहार ठरतील का? असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

जूनमध्ये सुरू होणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उपनगरीय रेल्वे मार्गांवर मार्च महिन्यापासूनच मान्सूनपूर्व कामांना सुरुवात होते. दरवर्षी मोठ्या प्रमाणात रेल्वे हद्दीतील व त्यालगतच्या वेगवेगळय़ा नाल्यांमधील गाळ उपसण्यासह मोऱ्यांच्या स्वच्छतेची कामे, विविध ठिकाणी पावसाळी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप बसविणे, आवश्यक तेथे वृक्ष छाटणी करणे आदी कामे करण्यात येतात. गतवर्षी मध्य आणि हार्बर मार्गावर पावसाचे पाणी साचू नये म्हणून सुमारे २८ ठिकाणी साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा उपसा करणारे पंप बसविण्यात आले. परंतु मुसळधार पाऊस कोसळला की, अनेकदा या उपाययोजनांचे तीनतेरा वाजतात; मात्र यंदा यामध्ये आवश्यक सुधारणेची कामे युद्धपातळीवर सुरू असून मान्सूनपूर्व कामे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण होणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. तसेच यंदा अधिक क्षमतेचे पंप बसविण्यात येणार असून, त्यामुळे ९ हजार घन मीटर प्रति तास पाण्याचा उपसा होऊ शकेल, अशी यंत्रणा उभारली जात असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मान्सूनपूर्व कामे मार्च महिन्यातच सुरू करण्यात आली आहेत. मध्य रेल्वेवर काहीठिकाणी पाणी साचते; मात्र त्यावर वेळोवेळी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यंदा देखील महत्त्वाची ठिकाणी  ओळखून कामे सुरू आहेत. विनाअडथळा सेवा सुरू राहील, असा आमचा विश्वास आहे.    
- प्रवीण पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in