
मुंबई : जानेवारी महिन्यांत बिहारमध्ये झालेल्या प्रेमकुमार पासवान या व्यक्तीच्या हत्येतील नवीनकुमार प्रियकुमार रंजन नावाच्या वॉण्टेड आरोपीस साकिनाका येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याचा ताबा बिहारच्या परसा बाजार पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. त्याला ट्रॉन्झिंट रिमांडवर बिहारला पुढील चौकशीसाठी नेले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. बिहारमध्ये हत्या करुन गेल्या आठ महिन्यांपासून वॉण्टेड असलेला एक आरोपी साकिनाका परिसरात वास्तव्यास असल्याच माहिती पोलीस उपनिरीक्षक सुहास कांदे यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गबाजी चिमटे यांच्या पथकातील सुहास कांदे, सोनावणे, बर्डे, पाटील, भिंगावडे यांनी या आरोपीचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असतानाच नवीनकुमार रंजन याला शनिवारी सोसायटी मशिदीजवळील परिसरातून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. तपासात ४ जानेवारी २०२३ रोजी प्रेमकुमार पासवान या व्यक्तीची काही अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली होती. या गोळीबारात त्याचा मित्र राहुलकुमार ऊर्फ ललन सुपारी हा गंभीररीत्या जखमी झाला होता. या गोळीबारानंतर बिहारच्या परसा बाजार पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध कट रचून हत्या, हत्येचा प्रयत्न करणे तसेच आर्म्स ऍक्टतंतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नवीनकुमार रंजन याचे नाव समोर आले होते; मात्र गोळीबारानंतर तो पळून गेला होता.