दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांकडून जय्यत तयारी सुरु

नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना मुंबईत हजर राहण्याचे आदेशही सोडले आहेत.
दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांकडून जय्यत तयारी सुरु

शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांचाही दसरा मेळावा मुंबईत होणार आहे. दोन्ही गटांसाठी हा दसरा मेळावा अतिशय महत्त्वाचा आहे. दोन्ही गटांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. राज्यभरातून कार्यकर्ते या दिवशी मिळेल त्या वाहनाने मुंबईत येऊन धडकणार आहेत. मुंबईत या दिवशी अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळणार असून, अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना मुंबईत हजर राहण्याचे आदेशही सोडले आहेत.

शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणाचा यावरूनही रणकंदन झाले. हा वाद न्यायालयात पोहोचला. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी न्यायालयाने दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेणार आहेत. दोन्ही गटांना आपापले शक्तिप्रदर्शन करायचे आहे. शिवसेना कोणाची हा वाद न्यायालयात असला तरी त्यात बरेचसे तांत्रिक आणि कायदेशीर मुद्दे असतात. खरा पक्ष हा रस्त्यावरच कार्यकर्त्यांच्या ताकदीने दिसत असतो. दोन्ही गटांना याची जाण आहे. त्यामुळेच दसरा मेळाव्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी दोन्ही गटांनी केली आहे. ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी नेते व शिवसैनिक यांना दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाजी पार्क तसेच बीकेसी या दोन्ही मैदानांची क्षमता एक लाख प्रत्येकी आहे. ठाकरे गटासाठी तर आता अस्तित्वाची लढाई आहे. आगामी मुंबई महापालिका ठाकरे गटासाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. दरम्यान, एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबईत गर्दी होणार असल्याने पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे.

मुंबईत या दिवशी अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या वाहनांचे नियोजन करणे, हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान असणार आहे. त्यातच दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणताही अनावस्था प्रसंग निर्माण होऊ नये, कायदा व सुव्यवस्था राखली जावी, हेदेखील मोठे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in