भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करा ;खासदार राहुल शेवाळे यांचे आयुक्तांना पत्र

भटक्या कुत्र्यांची योग्य ती काळजी घेतली जात नसून खाद्य, वैद्यकीय उपचार मिळत नसल्याने कुत्र्यांना विविध आजार होतात, असे ही निदर्शनास आले आहे
भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करा ;खासदार राहुल शेवाळे यांचे आयुक्तांना पत्र

मुंबई : मुंबईत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत असून, दरवर्षी सुमारे ६५ हजार मुंबईकरांना भटके कुत्रे चावा घेतात, असे निदर्शनास आले आहे. काही दिवसांपूर्वी एका टी कंपन्यांच्या मालकावर हल्ला केला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करत शेल्टर हाऊस उपलब्ध करा, असे पत्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंग चहल यांना दिले आहे.

मुंबईत भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला असून, लहान मुलांसह मोठ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईत भटक्या कुत्र्यांनी पोस्टमनवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ही वारंवार उद्भवणारी समस्या आहे. त्यामुळे मुंबईतील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखत मुंबईकरांच्या जीवाचे रक्षण करणे गरजेचे आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांवर उपद्रव रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात यावा, अशी सूचना शेवाळे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रातून केली आहे.

शेल्टर हाऊस बांधा

भटक्या कुत्र्यांची योग्य ती काळजी घेतली जात नसून खाद्य, वैद्यकीय उपचार मिळत नसल्याने कुत्र्यांना विविध आजार होतात, असे ही निदर्शनास आले आहे. भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर हाऊस बांधण्यात यावे, जेणे करुन त्यांची काळजी घेतली जाईल आणि हल्ल्याचे प्रमाण रोखण्यात येईल. यासाठी मुंबईकरांची साथ मिळेल, असा विश्वास राहूल शेवाळे यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in