मुंबई : मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांतील एकूण ४२० उमेदवारांमधून आपले ३६ आमदार निवडण्यासाठी बुधवारी शहर आणि उपनगरातील एक कोटी दोन लाख २९ हजार ७०८ मतदारांना बुधवारी, २० तारखेला लोकशाहीच्या उत्सवात सुवर्णसंधी चालून आलेली असताना १० हजार ११७ मतदान केंद्रांवर मतदार राजाचे स्वागत करण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. केवळ मतदानच नाही तर, त्यानंतर ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे ठेवण्यासाठीच्या स्ट्राँगरूमचे व्यवस्थापन आणि मतमोजणी केंद्रे यांची जय्यत तयारी झाली आहे, अशी माहिती निवडणूक यंत्रणेकडून देण्यात आली.
गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईत अनेक ठिकाणी मतदानाची प्रक्रिया संथगतीने झाल्याने मतदारांना रांगांमध्ये ताटकळत राहावे लागले होते. या प्रकारच्या तक्रारी लक्षात घेऊन या वेळी विधानसभेच्या मतदानासाठी केंद्रांवर आवश्यक ती दक्षता घेण्यात आली आहे. मतदान केंद्रांची फेररचना केल्यानंतर मुंबई शहरात ६७१ ठिकाणी दोन हजार ५३८ केंद्रे, तर उपनगरात एक हजार ४१४ ठिकाणी सात हजार ५७९ केंद्रे उभारली आहेत. म्हणजेच संपूर्ण मुंबईत दोन हजार ८५ ठिकाणी १० हजार ११७ मतदान केंद्रे उभारली आहेत. त्यामुळे एकाच केंद्रावर मतदारांची खूप गर्दी होणार नाही. त्याशिवाय रांगांचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. एक मतदार बुथमध्ये गेल्यानंतर मतदानासाठी सुमारे ४५ सेकंद ते ६० सेकंद लागतात, असे गृहित धरून रांग कायम पुढे सरकत राहील, असे नियोजन केले आहे. त्याशिवाय जर गर्दी वाढली तर मतदारांना बसण्यासाठी बाकडी, खुर्च्या तसेच प्रतीक्षा गृह अशी व्यवस्था आहे. तसेच मतदारांना पिण्याचे पाणी मिळेल आणि तेथे प्रसाधन गृहाची सुविधाही ठेवली आहे. त्यांच्या स्वच्छतेसाठी महापालिकेचे खास कर्मचारी नेमले आहेत. दिव्यांग मतदारांसाठी प्रथमच दिव्यांग मित्र नियुक्त केले आहेत. या वेळी सुमारे नऊ टक्के मतदान केंद्रे ही उंच इमारतींमध्ये ठेवली आहेत. या वेळी मतदारांना तक्रारीसाठी कुठेही जागा ठेवलेली नाही, अशी माहिती मुंबईचे (शहर आणि उपनगर) जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी तसेच अतिरिक्त निवडणूक अधिकारी विपीन शर्मा यांनी दिली. या पार्श्वभूमीवर या वेळी मुंबईत मतदानाचा टक्का चांगलाच वधारेल, असा विश्वास गगराणी यांनी व्यक्त केला आहे. एकूण मतदार केंद्रांपैकी ८४ मॉडेल मतदान केंद्रे आहेत. यातील प्रत्येकी ३८ मतदार केंद्रांचे संचालन महिला आणि तरुण कर्मचारी वर्गांकडून केला जाणार आहे. तर, आठ मतदार केंद्र दिव्यांग कर्मचाऱ्यांद्वारा संचालित केले जाणार आहे.
दरम्यान, सर्व मतदान केंद्रांवर करण्यात आलेल्या वेब कास्टिंग व्यवस्थेची जोडणी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी त्याची पाहणी केली.
प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया राबविण्यासाठी मतदानाशी संबंधित कर्मचाऱ्यांची पथके त्यांना निश्चित करून दिलेल्या मतदान केंद्रांवर संपूर्ण यंत्रणांसह मंगळवारी रवाना झाले. मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर मतदानासाठी एकूण १४ हजार १७२ बॅलेट युनिट, १२ हजार १२० कंट्रोल युनिट आणि १३ हजार १३१ व्हीव्हीपॅट संयंत्र तयार आहेत. प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर ४६ हजार ८१६ अधिकारी, कर्मचारी तसेच २५ हजार ६९६ पोलिस अधिकारी, कर्मचारी कार्यरत असतील.
प्रत्येकाने आवर्जून मतदान करावे ; गगराणी यांचे आवाहन
बुधवार, दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरळीतपणे राबविण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मूलभूत सोयीसुविधांची पूर्तता, चोख सुरक्षाव्यवस्था आणि पुरेसे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीही सर्व नागरी सोयीसुविधा आणि उपाययोजनांच्या अनुषंगाने या प्रक्रियेत कार्यरत आहेत. निवडणुकीसाठी प्रशासनाने उत्तम आणि चोख व्यवस्था केली असली तरी आता प्रत्यक्ष मतदान करून लोकशाही बळकट करण्याची जबाबदारी सजग मतदारांवर आहे. त्यामुळे, मुंबईतील सर्व मतदारांनी आवर्जून मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केले आहे.
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी विशेष व्यवस्था
दिव्यांग मतदारांना सुलभ पद्धतीने मतदान करता यावे, यासाठी बृहन्मुंबई कार्यक्षेत्रातील (मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा) प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये १ हजार २८४ ठिकाणांहून दिव्यांग मतदारांची ने-आण करण्यासाठी ९९७ वाहनांच्या माध्यमातून मोफत वाहतूक, २ हजार ८५ मतदान केंद्रावर ३ हजार ३८८ ‘व्हीलचेअर’, दिव्यांगांच्या मदतीसाठी स्वतंत्र स्वयंसेवकांचे सहाय्य आदी बाबींचा समावेश आहे. या सुविधेविषयी अधिक माहिती किंवा मदतीसाठी १९५० या हेल्पलाईनवर संपर्क करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
मतदानाच्या ठिकाणी १२ पैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा ग्राह्य
मतदान केंद्रावर मतदाराने स्वत:ची ओळख पटवून देण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ दस्तऐवजांपैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरीत करण्यात आलेले पासबुक, कामगार मंत्रालयाद्वारा वितरीत आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), निवृत्तीवेतनाचे दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र; संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना वितरीत केलेले विशेष ओळखपत्र असे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.
प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे. नागरिकांनी यापैकी किमान एक ओळखीचा पुरावा मतदानासाठी येताना सोबत बाळगावा, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.