वीज ग्राहकांवर दरवाढीचा भुर्दंड; महावितरणकडून ‘इंधन समायोजन शुल्का’त वाढ

वीज वापरावरून १० पैसे व ७० पैसे दरवाढ करण्यात आली आहे. डिसेंबरच्या बिलापासून ही दरवाढ लागू होणार आहे.
वीज ग्राहकांवर दरवाढीचा भुर्दंड; महावितरणकडून ‘इंधन समायोजन शुल्का’त वाढ
Published on

भालचंद्र चोरघडे/मुंबई : महावितरणची वीज वापरण्यापूर्वी आता सावध राहा. कारण विजेसाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. महावितरण कंपनीने निवासी व व्यावसायिक ‘इंधन समायोजन शुल्का’त वाढ प्रस्तावित केली आहे.

वीज वापरावरून १० पैसे व ७० पैसे दरवाढ करण्यात आली आहे. डिसेंबरच्या बिलापासून ही दरवाढ लागू होणार आहे. या वीज बिलवाढीचा फटका नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरारसह महावितरणच्या विभागातील ग्राहकांना बसेल.

महागडी वीज खरेदीसाठी लागणारा खर्च भरून देण्याचे आदेश २०२० मध्ये महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने महावितरणला दिले आहेत. जो ग्राहक जास्त वीज वापरेल, त्यांना अधिक समायोजन इंधन शुल्क भरावे लागेल. तर कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना कमी वीज शुल्क लागेल. जर एखादा ग्राहक १०० युनिट दरमहा वापरत असेल तर त्याला केवळ २० पैसे वाढ भरावी लागेल तर जो ग्राहक ५०० युनिटपर्यंत वीज वापरेल, त्याला ७० पैसे युनिटने इंधन समायोजन शुल्क भरावे लागेल. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना केवळ १० पैसे इंधन समायोजन शुल्क भरावे लागेल, असे ‘महावितरण’च्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

हा अधिकारी म्हणाला की, इंधन समायोजन शुल्क किरकोळ असून त्यामुळे वीज बिल फार मोठ्या प्रमाणात वाढणार नाही. मात्र, दरवाढीमुळे महावितरणला मोठा फायदा मिळेल. कारण वीज वितरण कंपनी वीज खरेदीसाठी होणारा खर्च भागवण्यास सक्षम असेल. व्यावसायिक वीज वापरकर्त्यांना घरगुती ग्राहकांप्रमाणेच अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे, असे हा अधिकारी म्हणाला.

logo
marathi.freepressjournal.in