देशाच्या विकासासाठी सागराशीही टक्कर; पंतप्रधान मोदींची गॅरंटी: अटल सेतूसह ३३ हजार कोटींच्या कामांचे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूच्या लोकार्पणासह विविध प्रकल्पांचा शिलान्यास तसेच भूमीपूजन करण्यात आले.
देशाच्या विकासासाठी सागराशीही टक्कर; पंतप्रधान मोदींची गॅरंटी: अटल सेतूसह ३३ हजार कोटींच्या कामांचे लोकार्पण

प्रतिनिधी/मुंबई : शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन मी कार्य सुरू केले होते, त्याला आता दहा वर्षे होत आहेत. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने सांगितले होते, देश बदलणारच आणि जरूर बदलणार. देशातील जनतेने या दहा वर्षांत आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात येताना पाहिले आहे. देशाच्या विकासासाठी आपण समुद्राशीही टक्कर घेऊ शकतो. लाटांनाही तोंड देऊ शकतो, हे आपण दाखवून दिले. जिथे इतरांची गॅरंटी संपते, तिथे मोदीची गॅरंटी सुरू होते. याच मोदी गॅरंटीच्या माध्यमातून मी आज सांगत आहे की, येत्या काही वर्षांत मी देशातील २ कोटी महिलांना लखपती दीदी बनविणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ज्यांनी आधी देशावर अनेक वर्ष राज्य केले त्यांची नियत फक्त व्होटबँक आणि कुटुंबाच्या भल्यासाठीच सत्ता राबविणे इतकीच होती. त्यांच्याकडे विकासाचे कोणतेही धोरण नव्हते. आधी हजारो कोटींच्या घोटाळ्यांचीच चर्चा व्हायची. पण, आज हजारो कोटींच्या विकास प्रकल्पांची चर्चा होत असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवरही निशाणा डागला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूच्या लोकार्पणासह विविध प्रकल्पांचा शिलान्यास तसेच भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर नवी मुंबई येथे आयोजित जनसभेस त्यांनी संबोधित केले. मुंबई शहर आणि उपनगरातून मोठ्या संख्येने उपस्थित सर्वांना माझा नमस्कार, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली. ‘‘आजचा दिवस मुंबई आणि महाराष्ट्रासोबतच विकसित भारतासाठी ऐतिहासिक आहे. आज जगातील सर्वात मोठ्या समुद्रीसेतूंपैकी एक अशा अटल सेतूचे देशार्पण झाले आहे. देशाच्या विकासासाठी आपण समुद्राशीही टक्कर घेऊ शकतो. लाटांनाही तोंड देऊ शकतो, हे आपण दाखवून दिले. २६ डिसेंबर २०१६ ला याचे भूमिपूजन केले होते. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने सांगितले होते देश बदलणारच आणि जरूर बदलणार, ही तेव्हा मोदीची गॅरंटी होती. आज मी छत्रपती शिवाजी महाराज, मुंबादेवी, सिद्धीविनायकाला प्रणाम करत हा अटल सेतू मुंबईकर व देशाला समर्पित करत आहे. कोरोनाच्या संकटानंतरही या सेतूचे काम पूर्ण होणे, ही मोठी उपलब्धी आहे. लोकार्पणाचे कार्यक्रम लोकांना भुलविण्यासाठी नव्हे तर प्रत्येक प्रकल्प हा भारताच्या नवनिर्माणाचे माध्यम आहे. अशा एक एक प्रकल्पामुळे भव्य भारताची इमारत बनत आहे. आज मुंबई व महाराष्ट्राच्या ३३ हजार कोटींच्या प्रकल्पाच्या शिलान्यास व लोकार्पण झाले आहे. महाराष्ट्रात देवेंद्रजीपासून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या टीमचे हे यश आहे. जी गॅरंटी मोदीने दिली, त्याला महाराष्ट्र सरकार देखील पुढे नेत आहे, अशी कौतुकाची थाप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारच्या पाठीवर टाकली.

शिंजो आबे यांची आठवण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी जपानचे दिवंगत पंतप्रधान शिंजो आबे यांची आवर्जून आठवण काढली. अटल सेतू बनविण्याचे स्वप्न मी आणि माझे मित्र शिंजो आबे दोघांनी पाहिले होते. आज ते पूर्ण होत आहे. या प्रकल्पाला पूर्णत्वात नेण्यास जपानचा महत्वाचा वाटा असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

अटल सेतू जनतेच्या आकांक्षांचा जयघोष

अटल सेतू हा जनतेच्या आकांक्षांचा जयघोष असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ‘‘आज जो कोणी अटल सेतू पाहतो, त्याला गौरवान्वित वाटते. प्रत्येक जण याच्यामुळे प्रभावित आहे. आज मी छत्रपती शिवाजी महाराज, मुंबादेवी, सिद्धीविनायकाला प्रणाम करत हा अटल सेतू मुंबईकर व देशाला समर्पित करत आहे. कोरोनाच्या संकटानंतरही या सेतूचे काम पूर्ण होणे ही मोठी उपलब्धी आहे. लोकार्पणाचे कार्यक्रम लोकांना भुलविण्यासाठी नव्हे तर प्रत्येक प्रकल्प हा भारताच्या नवनिर्माणाचे माध्यम आहे. अशा एक एक प्रकल्पामुळे भारताची भव्य इमारत बनत आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

आधी घोटाळ्यांची चर्चा, आज विकासाची चर्चा

दहा वर्षांपूर्वी हजारो कोटींच्या मेगास्कॅमची चर्चा व्हायची, आज हजारो कोटींच्या प्रकल्प पूर्णत्वाची चर्चा होते. ज्यांनी अनेक वर्षे शासन केले, त्यांची नियत फक्त व्होट बँक आणि कुटुंबाच्या भल्यासाठी सत्ता राबविणे इतकीच होती. विकासाचे कोणतेही धोरण नव्हते. पूर्वी १२ लाख कोटी बजेट पायाभूत विकासासाठी होते, ते वाढवून आम्ही ४४ लाख कोटींचे बजेट दिले. महाराष्ट्रात आठ लाख कोटींचे प्रोजेक्ट पूर्ण किंवा सुरू आहेत. राज्य मोठया प्रमाणात रोजगारवाढ करत आहे. कोस्टल रोड, फ्री वे, मुंबईला पहिली बुलेट ट्रेन देखील लवकरच मिळेल. दिल्ली-मुंबई फ्रेट कॉरिडॉर बनणार आहे. महाराष्ट्र अनेक प्रकल्पांचा साक्षी राहिला आहे. नवी मुंबई मेट्रो प्रोजेक्ट देखील आधीच्या सरकारमध्ये अडकला होता पण डबल इंजिन सरकार आले आणि सुरू झाला. आमच्या सरकारची नियत आणि निष्ठा साफ आहे. फक्त देशवासियांच्या प्रती नीती होती व आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

२ कोटी महिलांना लखपती बनविणार

पंतप्रधान म्हणाले, ‘‘डबल इंजिन सरकार कोणत्याही राज्यात असो, महिला कल्याण ही आमची पहिली गॅरंटी आहे. आमच्या सर्व सुरू होणाऱ्या योजनाही याचाच भाग आहेत. जी गॅरंटी मोदीने दिली, त्याला महाराष्ट्र सरकार देखील पुढे नेत आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, नारी शक्तीदूत ॲप्लीकेशन, लेक लाडकी योजना याचे उत्तम उदाहरण आहे. आज या कार्यक्रमात इतक्या मोठ्या प्रमाणात महिला त्यामुळेच आशीर्वाद द्यायला आल्या आहेत. मोदी गॅरंटीच्या माध्यमातून मी आज सांगत आहे की, येत्या काही वर्षांत मी देशातील २ कोटी महिलांना लखपती दीदी बनविणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

महाराष्ट्र विकसित भारताचा भक्कम आधारस्तंभ

महाराष्ट्रातील मेगा विकास प्रकल्पांची उदाहरणे देताना पंतप्रधान मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे उद्घाटन आणि नवी मुंबई विमानतळ आणि कोस्टल रोड प्रकल्पाची कामे सुरू आहेत, यामुळे मुंबईतील कनेक्टिव्हिटीचा चेहरामोहरा बदलेल. इस्टर्न फ्री-वे च्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्हला जोडणाऱ्या भूमिगत रस्त्याचा बोगद्या तयार करण्यात येत आहे. “लवकरच, मुंबईलाही पहिली बुलेट ट्रेन मिळेल, असेही ते म्हणाले. “दिल्ली-मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉर महाराष्ट्राला मध्य आणि उत्तर भारताशी जोडेल. महाराष्ट्राला तेलंगणा, छत्तीसगड आणि इतर शेजारील राज्यांशी जोडण्यासाठी ट्रान्समिशन लाईनचे जाळेही टाकले जात आहे. तेल आणि वायू पाईपलाईन, औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी, नवी मुंबई विमानतळ आणि शेंद्रा-बिडकीन इंडस्ट्रियल पार्कचे मोठे प्रकल्प महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in