देशाच्या ध्येय धोरणासाठी पंतप्रधान मोदींनी आधीच पाऊल उचलले; उपसभापती निलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन, विधान भवनात ध्वजारोहण

गेल्या २५ वर्षांत भारताचे चित्र बदलले असून यापुढे भारत कसा असेल, भारताचे ध्येय धोरण यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच पाऊल उचलले आहे.
देशाच्या ध्येय धोरणासाठी पंतप्रधान मोदींनी आधीच पाऊल उचलले; उपसभापती निलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन, विधान भवनात ध्वजारोहण
एक्स @neelamgorhe
Published on

मुंबई : गेल्या २५ वर्षांत भारताचे चित्र बदलले असून यापुढे भारत कसा असेल, भारताचे ध्येय धोरण यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच पाऊल उचलले आहे. नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महाराष्ट्राच्या विकासासाठी पाऊल टाकले असून महिलांसाठी विविध योजना आणल्याने आज महिलांमध्ये अभूतपूर्व जनजागृती झाल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या.

भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विधान भवनात सभापती राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसभापती निलम गोऱ्हे यांच्यासह विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (२) (कार्यभार) विलास आठवले यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली राज्यघटना लागू झाली. त्याचसोबत भारतातल्या प्रत्येकाला कुठल्याही जातीचे, धर्माचे, वंशाचे किंवा स्त्री-पुरुष कुणीही असो प्रत्येकाला व्यक्तिगत स्वरूपाचे अधिकार प्राप्त झाले. ते अधिकार भाषण, विचार, आचरण स्वातंत्र्याशी संबंधित आहेत. कुठल्याही प्रकरणी कोणालाही कुणासोबत दुजाभाव करता येणार नाही, असे त्याच्यात अधोरेखित करण्यात आले. या ७५ वर्षांमध्ये देशात बरेच बदल झालेले आहेत. पहिल्या २५ वर्षांत लोकशाहीचे अधिकार आणि त्याचे उल्लंघन यासंदर्भात मोठी राजकीय आंदोलने झाली. आणीबाणीचा काळ त्यामध्ये लोटला आणि या काळानंतर कुठेही सत्तेचा अतिरेक झाला तर जनतेला ते आवडत नाही, असे निलम गोऱ्हे म्हणाल्या.

त्यानंतरच्या २५ वर्षांमध्ये जागतिकीकरण, माध्यमांचे जागतिकीकरण आणि चरितार्थासाठी नागरिकांची शहराकडे धाव आणि पर्यायाने नागरी विकासाकडे वाटचाल यासोबत, तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतीमध्ये विकास, शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती या २५ वर्षांमध्ये आपण पाहिली. तसेच, गेल्या २५ वर्षांमध्ये आपण शाश्वत विकास उद्दिष्ट, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, लाडकी बहीण योजनेसारखी लाडकी लेक योजना अशा विविध सामाजिक अर्थसहाय्य योजना आपण अंगिकारल्या. विशेषत: २००० सालानंतर भारताच्या जनगणनेमध्ये झालेल्या वाढीच्या अनुषंगाने भारताच्या संपूर्ण आर्थिक नियोजनाचीसुद्धा सुरुवात झाली. पुढच्या काळामध्ये भारताचे ध्येय धोरण काय असेल आणि त्यानुसार भारत कसा असेल या बाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारपूर्वक पावले उचलून देशाच्या नवनिर्माणाचे कार्य हाती घेतले आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी इतर कार्यासोबतच महिलांसाठी विविध योजना आणल्या आहेत. त्यामधून महिलांमध्ये अभूतपूर्व जागृती झालेली आहे. या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी समाज एकत्रितपणे स्त्रियांबरोबर त्यांच्या अधिकारासाठी उभा रहावा अशा प्रकारची अपेक्षा असल्याचे निलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.

logo
marathi.freepressjournal.in