पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जग जिंकले ;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जग जिंकले ;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ANI

मुंबई : ‘वसुधैव कुटुंबकम‌्’ ही संकल्पना घेऊन भारताने जी-२० परिषदेचे यजमानपद स्वीकारले आणि यशस्वी आयोजनही केले. या राष्ट्रगटाच्या अध्यक्षपदाचा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने भारताला प्रथमच मिळाला. ही देशवासीयांसाठी मोठी गर्वाची गोष्ट आहे. नरेंद्र मोदी यांनी देशाची कीर्ती जगभर पोहोचविली. देशाला महासत्ता बनविण्यासाठी ते अविरत परिश्रम घेत आहेत. त्याचेच एक सकारात्मक चित्र देशाने पाहिले. नरेंद्र मोदींनी जग जिंकले असून भारतासाठी तो एक ऐतिहासिक सुवर्णदिन होता, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, कॅनडा आदी अनेक बलाढ्य राष्ट्रांचे प्रमुख दिल्लीत आले होते. एकमताने आणि एक भावनेने एकत्र येऊन अधिक समृद्ध आणि सुसंवादी भविष्यासाठी काम करण्याचे वचन पंतप्रधानांनी यावेळी दिले. या शिखर परिषदेत पंतप्रधानांनी मांडलेला दिल्ली जाहीरनामा एकमताने स्वीकारण्यात आला. जी-२० समूहाने टाळ्या वाजवून तो स्वीकारला व बाके वाजवून स्वागत केले, हे आपले मोठे राजनैतिक यश असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

या शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. हे देशाच्या इतिहासातले सोनेरी पान आहे. नरेंद्र मोदींची जागतिक स्तरावरचा नेता अशी निर्माण झालेली प्रतिमा भारतासाठी निश्चितच अभिमानास्पद असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी ट‌्विटद्वारे स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in