यापेक्षाही मोठा प्रकल्प देण्याचे पंतप्रधानांचे आश्वासन - उद्योगमंत्री उदय सामंत

आम्हाला कोणत्या सवलती देण्यात येणार याची माहिती त्यांनी मागवली होती
यापेक्षाही मोठा प्रकल्प देण्याचे पंतप्रधानांचे आश्वासन - उद्योगमंत्री उदय सामंत

वेदांत प्रकल्प गुजरातला गेला याचे दु:ख आम्हाला आहेच; पण आघाडी सरकारनेच या प्रकरणी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे सांगून उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, या कंपनीने ५ जानेवारी २०२२ रोजीच राज्य सरकारला पत्र पाठविले होते. आम्हाला कोणत्या सवलती देण्यात येणार याची माहिती त्यांनी मागवली होती. सहा महिने आघाडी सरकारच्या हातात होते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी ३० जून रोजी झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ सादरीकरणही घेतले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल अग्रवाल यांच्याशी भेटून चर्चाही केली. ३८ हजार कोटींच्या सवलती देण्याचा निर्णयही घेण्यात आला. मात्र, आघाडी सरकारच्या काळात दोन वर्षांत केवळ भेटीगाठी घेण्यात आल्या, असे सामंत म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे. आता ज्या त्रुटी राहिल्या आणि त्यामुळे प्रकल्प गेला ते झाले ते होऊन गेले. पण महाराष्ट्राला आपण यापेक्षाही मोठा प्रकल्प निश्चित देऊ. महाराष्ट्रातील तरूणांना रोजगार मिळाला पाहिजे याची काळजी केंद्राला असल्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचे सामंत म्हणाले. पुढच्या आठ-दहा दिवसांत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच आमचा विभाग पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in