
मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील प्रस्तावित टोपीवाला पालिका मंडईतील गाळेधारकांना वापरासाठीची जागा उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी आवश्यक कार्यवाही वेगाने पूर्ण करावी. तसेच गाळेधारकांच्या पुनर्वसनासाठी प्राधान्य द्यावे अशा सूचना पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी टोपीवाला मंडईत गुरुवारी भेट देत बांधकामाची पाहणी केली. यावेळी स्थानिक आमदार विद्या ठाकूर, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, संचालक (अभियांत्रिकी) गोविंद गारूळे, नगर अभियंता महेंद्र उबाळे, सहायक आयुक्त (बाजार) मनीष वळंजू, सहायक आयुक्त (पी उत्तर) संजय जाधव, उप प्रमुख अभियंता यतीश रांदेरिया, कार्यकारी अभियंता प्रीतम सातर्डेकर यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंता यावेळी उपस्थित होते.
मौजे पहाडी गोरेगाव येथे उभारण्यात येणारी ही इमारत १६ मजली आहे. या इमारतीत ८०० आसन क्षमतेच्या सुसज्ज नाट्यगृहाचा समावेश आहे. मंडईत एकूण २०६ गाळे असतील. त्यात तळ मजल्यावर ११२ गाळे आणि पहिल्या मजल्यावर ९४ गाळ्यांचा समावेश आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात दोन मजल्यांचे बांधकाम पूर्ण करा
गाळेधारकांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी इमारतीची बांधकाम प्रक्रिया वेगाने करावी. तसेच येत्या वर्षभरात ही जागा वापरासाठी यावी म्हणून प्रकल्पाशी संबंधित बाबींची अंमलबजावणी करावी. गाळेधारकांना दिलासा म्हणून पुनर्वसनाच्या अनुषंगाने सुरूवातीच्या टप्प्यात दोन मजल्यांचे बांधकाम पूर्ण करावे, जेणेकरून गाळेधारकांना ही जागा व्यवसायासाठी वापरणे शक्य होईल, असे गगराणी यांनी सांगितले.