मुंबई : व्हेनेझुएलावर अमेरिकेने जी कारवाई केली ती आपण सगळ्यांनीच पाहिली, अमेरिकेतील जवानांनी व्हेनेझुएला येथे जाऊन राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले. आता असाच प्रकार भारतात घडेल का, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे असेच अपहरण केले जाईल का, आता तेवढेच बाकी राहिले आहे, असे धक्कादायक वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
व्हेनेझुएलामध्ये जे घडले तसेच भारतातही काही घडेल का, मोदी यांचे अपहरण ट्रम्प करतील का, आता तेवढेच बाकी राहिले आहे असे मला वाटते, असे चव्हाण यांनी म्हटले. भारत अमेरिकेचा दबाव सहन करतो आहे. भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या गोष्टी यावर मर्यादा यावी म्हणून टॅरिफ लादले गेले आहे. भारतातून निर्यात रोखणे हाच मुख्य हेतू आहे असे मला वाटते, असेही ते म्हणाले.
राजकीय वातावरण तापले
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अमेरिकेला निर्यात केल्यानंतर आपल्या देशाला जो नफा मिळत होता तो आता मिळणार नाही. आपल्याला त्यासाठी पर्यायी व्यवस्था बघावी लागेल. या दिशेने देशाचे प्रयत्न पहिल्यापासून सुरू आहेत. आता नेमके पुढे काय होणार हे बघावे लागेल. आता डोनाल्ड ट्रम्प हे मोदींचे अपहरण करतील का, हा प्रश्न आहे. कारण आता तेवढेच बाकी राहिले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे.