पृथ्वीराज चव्हाणांना डावलले महाराष्ट्रातून अशोक चव्हाण यांच्यासह सात जणांना स्थान

पृथ्वीराज चव्हाण हे राहुल गांधी यांच्याविरोधात तयार झालेल्या जी-२३ गटात सामील झाले
पृथ्वीराज चव्हाणांना डावलले महाराष्ट्रातून अशोक चव्हाण यांच्यासह सात जणांना स्थान

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपली नवीन कार्यकारिणी म्हणजे काँग्रेस वर्किंग कमिटीची घोषणा केली आहे. मात्र, यात महाराष्ट्रातील अनुभवी नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांना डावलल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मुकुल वासनिक, अविनाश पांडे (महासचिव), प्रणिती शिंदे, रजनीताई पाटील (प्रभारी), माणिकराव ठाकरे (प्रभारी) यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातून कायम निमंत्रितांमध्ये चंद्रकांत हंडोरे यांचाही समावेश आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पक्षाने प्रमोशन देत वर्किंग कमिटीत समावेश केला आहे. दरम्यानच्या काळात अशोक चव्हाण यांच्याबाबत संशयाचे धुके निर्माण करण्यात आले होते. मात्र, आता त्याला छेद देत पक्षाच्या सर्वोच्च समितीत स्थान देत अशोक चव्हाण यांच्यावर पक्षनेतृत्वाने विश्वास टाकला आहे. बाळासाहेब थोरात यांचा मात्र यात समावेश नाही. थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे यांनी पदवीधर निवडणुकीत बंडखोरी केली होती. तेव्हा बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील संघर्षही चव्हाट्यावर आला होता. त्याचा फटका थोरात यांना बसल्याचे मानण्यात येत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेच्या आणि अनुभवी नेत्यालाही पक्षाने डावलले आहे. पृथ्वीराज चव्हाण हे राहुल गांधी यांच्याविरोधात तयार झालेल्या जी-२३ गटात सामील झाले होते. त्याचा त्यांना फटका बसल्याचे बोलले जात आहे.

विदर्भात भाजपला आव्हान देत लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कमिटीतील माणिकराव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यशोमती ठाकूर यांच्या रूपाने पक्षाने विदर्भाला झुकते माप दिले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तसेच नंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी यशोमती ठाकूर यांचे नाव आघाडीवर होते, मात्र दोन्ही पदांनी त्यांना हुलकावणी दिली. आता पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. अमरावती भागातील सहकार क्षेत्रात यशोमती ठाकूर यांचा दबदबा आहे. अमरावतीची लोकसभेची उमेदवारी देखील कदाचित यशोमती ठाकूर यांना देण्यात येऊ शकते.

हा माझा सन्मान -अशोक चव्हाण

‘‘काँग्रेस पक्षात सर्वोच्च असलेल्या काँग्रेस कार्यसमितीवर काम करण्याची संधी मिळणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान असून, त्यासाठी मी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पक्षाचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांचा मनःपूर्वक आभारी आहे. युवक काँग्रेसपासून पक्षाच्या अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या मला मिळाल्या आहेत आणि प्रत्येक जबाबदारी मी नेहमीच प्रामाणिकतेने व परिश्रमपूर्वक पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस कार्यसमितीचा सदस्य म्हणून देखील मी पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरविण्यास वचनबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in