

स्वीटी भागवत
मुंबई : महाराष्ट्रातील मालमत्ता नोंदणीसाठी आता खासगी क्षेत्राचा पर्याय उपलब्ध होणार आहे. वातानुकूलित परिसर, प्रतीक्षा कक्ष आणि आधुनिक तंत्रज्ञानयुक्त सेवा पुरवणाऱ्या नव्याने सुरू झालेल्या मॉडेल सब-रजिस्ट्रार कार्यालयांमध्ये (एसआरओ) प्रत्येक नोंदणीसाठी ५,५०० रुपये शुल्क आकारले जाईल.
पुण्यातील पहिल्या केंद्राच्या यशस्वी सुरुवातीनंतर आता मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), नवी मुंबई आणि नागपूर येथे तीन नवी मॉडेल सब-रजिस्ट्रार कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. गुरुवारी बीकेसी येथील केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
या खासगी मॉडेल केंद्रांमध्ये गोळा होणारे ५,५०० रुपयांचे शुल्क हे केंद्रे चालवण्यासाठी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी खासगी कंत्राटदाराच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असेल. विद्यमान सरकारी सब-रजिस्ट्रार कार्यालयांमध्ये कोणतीही अतिरिक्त सेवा शुल्क न आकारता नोंदणी प्रक्रिया पूर्ववत सुरू राहील.
नोंदणी उपनिरीक्षक (आयजीआर) कार्यालयातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वर्षाला नोंदणीची संख्या दररोज ५० ने वाढल्यास, अतिरिक्त नोंदणी उत्पन्नातील हिस्सा खासगी कंत्राटदाराकडून राज्य 'आयजीआर'ला दिला जाईल.
'व्हिएफएस ग्लोबल' आणि 'वी एक्सेल सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड' यांच्या एकत्रित समूहाला नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक कार्यालयाने यंदा पाच वर्षांचे कंत्राट दिले आहे. याअंतर्गत टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रात ६० मॉडेल सब-रजिस्ट्रार कार्यालये उभारली जात आहेत.
हाच समूह सध्या मुंबईतील पासपोर्ट कार्यालयांची व्यवस्था पाहत आहे. 'व्हिएफएस ग्लोबल' ही जागतिक कंपनी व्हिसा, पासपोर्ट आणि कन्सुलर सेवांचे व्यवस्थापन करते.
पहिल्या टप्प्यात ३० केंद्रे स्थापन करणार
पहिल्या टप्प्यात मुंबई महानगर प्रदेश (मुंबई, नवी मुंबई, ठाणे), पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे ३० केंद्रे उभारली जाणार असून उर्वरित ३० केंद्रे इतर जिल्ह्यांत स्थापन केली जातील. पहिल्या टप्प्यातील केंद्रे येत्या जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत कार्यरत होण्याची अपेक्षा आहे. या मॉडेल केंद्रांमध्ये प्रत्येकी एक सब-रजिस्ट्रार आणि एक वरिष्ठ लिपीक असे सरकारी कर्मचारी असतील, तर उर्वरित कर्मचारी कंत्राटदाराकडून पुरवले जातील.
ही होतील कामे
या केंद्रांमध्ये खरेदी-विक्रीचे दस्तऐवज, भाडे करार, बक्षीस पत्र, मुखत्यारपत्र आणि मृत्युपत्र यांसारख्या कागदपत्रांची नोंदणी होईल. पूर्णपणे वातानुकूलित परिसर, वाय-फायसह प्रतीक्षा कक्ष, प्रशिक्षित कर्मचारी, अल्पोपहार आणि शुद्ध पिण्याचे पाणी अशा आधुनिक सुविधा येथे पुरवल्या जात आहेत.